(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटन असलेल्या गणपतीपुळे येथे कोल्हटकर तिठ्यातील सांडपाण्याची समस्या सध्या मोठी डोकेदुखी ठरली आहे. तसेच गणपतीपुळे तिर्थक्षेत्रासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर होऊनही येथील ग्रामस्थांच्या व येणाऱ्या पर्यटकांच्या अंगावर गटाराच्या पाण्याचा अभिषेक होत असल्याने येथील सर्वच स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. या कारणाने आक्रमण झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी एकवटून नुकतेच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांचेसह शासकीय यंत्रणांना याबाबत लेखी निवेदन दिले आहे.
या लेखी निवेदनातून ग्रामस्थांनी आपले म्हणणे मांडताना म्हटले आहे की, येथील गणपतीपुळे ग्रामपंचायतीने ग्रामस्थांचे म्हणणे न ऐकता पावसाळ्यात पाण्याने दुधडी भरून वाहणाऱ्या वाहळात टाकलेली पाईपलाईन सलग सन 2017 ,2018 व 2019 मध्ये वाहून गेली. त्यामुळे पावसाचे सहा महिने ग्रामस्थांना गटाराची दुर्गंधी, डास, विहिरीचे दूषित पाणी यांचा सामना करावा लागत आहे.
सन 2019 मध्ये ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये गणपतीपुळे येथील आपटा ते गणपतीपुळे एसटी स्टँड रस्त्या लागत व त्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या लॉजिंग व हॉटेल व्यावसायिक व स्थानिक रहिवासी यांची सांडपाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी गणपतीपुळे येथील आपटातिठा ते एसटी स्टँड रस्त्याच्या बाजूने सांडपाण्याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून 2019 ला आपटातिठा ते एसटी स्टँड रस्त्याच्या बाजूने सांडपाणी पाईपलाईन करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर झालेला आहे. मात्र याचा पाठपुरावा करण्याऐवजी हा ठराव त्या वेळेचे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी बासनात गुंडाळून ठेवत जाणून बुजून सांडपाणी पाईपलाईन न करता येथील काही ठराविक सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या आदेशानुसार दरवर्षी सन 2018, 2019, 2020, 2021 व 2022 या वर्षी पावसाच्या पाण्याने दुधडी भरून वाहणाऱ्या वाहळात पाईप लाईन टाकून ती पुन्हा काढली जात आहे. तसेच गणपतीपुळे ग्रामपंचायत गेली दोन वर्षे सांडपाणी पाईपलाईनचे अंदाजपत्रक काढण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचे असल्याचे दिसून आले आहे. तसेच याबाबत विचारणा केल्यास अजून अंदाजपत्रक केलेले नाही इंजिनियर साहेबांना पत्र दिलेले आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे ग्रामपंचायत कार्यालयातून मिळत असल्याची माहिती संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी स्थानिक पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ग्रामस्थांचा पाठपुरावा
गणपतीपुळे येथील सांडपाण्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या विहिरी दूषित झाल्या असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र याकडे जाणीवपूर्वक सरपंच व ग्रामसेवक हे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत असून येथील बुजुर्ग ग्रामस्थांनी आपटातिठा ते एसटी स्टँड अशी सांडपाण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच चिमणपऱ्यात सांडपाणी सोडू नये यासाठी पाठपुरावा करून सुद्धा येथील ग्रामस्थांचा विरोध झुगारून 2017 साली सुमारे 16 लाख 55 हजार रुपये खर्च करून चिमणपऱ्यातून पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु ती एक वर्ष सुद्धा टिकली नाही त्या 2017 पासून ग्रामपंचायत त्यावर खर्च करत आहे.
सदर पाईपलाईनची शासकीय चौकशी उच्च अधिकाऱ्यांमार्फत चालू असून अशा वादात सापडलेल्या व ग्रामस्थांचा विरोध असलेल्या सांडपाणी पाईपलाईनसाठी ग्रामपंचायत हजारो रुपयांचा फंड अनधिकृत वाया घालवित असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आज गणपतीपुळे कोल्हटकर तिठा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सांडपाणी रस्त्यावर ओसंडून वाहत आहे. हेच सांडपाणी येथे आलेल्या पर्यटकांच्या अंगावर उडत आहे, याच रस्त्यावर प्राथमिक शाळा गणपतीपुळे येथील लहान मुले मार्गक्रमण करत असतात. तर याच रस्त्यावरून येणारी जाणारी वाहने पाणी बघून थांबत नाहीत तर सरळ पाणी अंगावर उडवून पुढे जातात. यामध्ये सामान्य नागरिकांसह लहान मुलांमध्ये सदर घाणीचे सांडपाणी अंगावर उडून जर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायत गणपतीपुळे, ज्या लॉजिंग हॉटेलचे सांडपाणी आहे, ते मालक जबाबदार राहणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. या डोईजड झालेल्या सांडपाण्याच्या समस्येबाबत येथील सर्व ग्रामस्थांनी एकवटून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांना लेखी निवेदन सादर केले असून त्याची माहितीसाठी प्रत जिल्हा नियोजन कार्यालय रत्नागिरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी, गटविकास अधिकारी पंचायत समिती रत्नागिरी, सरपंच ग्रामपंचायत गणपतीपुळे पोलीस निरीक्षक जयगड , पोलीस उपनिरीक्षक गणपतीपुळे पोलीस स्टेशन आदी यंत्रणांना सादर केले आहे. त्यामुळे याविषयी संबंधित शासकीय यंत्रणांकडून नेमकी कोणती भूमिका घेतली जातेय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.