(गणपतीपुळे/वैभव पवार)
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेच्या वातावरणात मंगळवारी 19 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. या निमित्ताने संस्थान श्रीदेव गणपतीपुळे, ग्रामपंचायत गणपतीपुळे, व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाची अतिशय चोख व्यवस्था व नियोजन करण्यात आल्याने हा यात्रोत्सव अतिशय सुरळीत पार पाडण्यात आला. या अंगारकी यात्रोत्सवासाठी संस्थान श्रीदेव गणपतीपुळे च्या वतीने वतीने स्वयंभू गणेश मंदिर पहाटे साडेतीन वाजता खुले करण्यात आले. त्यानंतर प्रारंभी स्थानिक पुजाऱ्यांच्या हस्ते पूजाअर्चा, मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात आले.
यावेळी मंदिर परिसरात संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्या वतीने दर्शन रांगांची अतिशय चोख व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी दर्शन रांगांवर सावलीची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची सोय भाविकांसाठी संस्थान श्रीदेव गणपतीपुळे व ग्रामपंचायत गणपतीपुळे यांच्या वतीने करण्यात आली. या यात्रा उत्सवासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहितकुमार गर्ग व अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा पोलीस अधिकारी दीडशे पोलिस कर्मचारी व 30 दंगल नियंत्रण पथकाचे कर्मचारी कार्यरत होते. या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी मंदिर परिसरात तसेच समुद्र परिसरात विशेष जनजागृती करून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले.
यावेळी विशेषतः गणपतीपुळे समुद्र किनार्यावर सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी कार्यरत राहून आपल्या ध्वनीक्षेपकाद्वारे धोक्याच्या सूचना देऊन भाविकांना समुद्रस्नान करताना कमी पाण्यात समुद्रस्नान करण्याचे आव्हान केले. या उत्सवानिमित्त घाटमाथ्यावरून सांगली, कोल्हापूर, सातारा, इचलकरंजी, कवठेमहांकाळ, मिरज, कराड, इस्लामपूर इत्यादी ठिकाणाहून लाखो भाविक दर्शनासाठी आले होते. कोरोनाच्या दोन वर्षानंतर पहिलीच निर्बंधमुक्त अंगारकी असल्याने यावेळी आपल्या स्वयंभू गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी उपस्थिती सोमवारी सायंकाळपासूनच गणपतीपुळे येथे दर्शविली होती.
यावेळी आलेल्या भाविकांना घाटमाथ्यावरील विविध गणेश मंडळाने खिचडी प्रसादाचे वाटप केले. यावेळी यात्राउत्सव पार पडण्यासाठी घाटमाथ्यावर विविध दुकानदार देखील दाखल झाले होते. यावेळी आलेल्या सर्वच भाविकांनी श्रींच्या दर्शनाबरोबरच यात्रा उत्सवानिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटला. या अंगारकी चतुर्थी निमित्ताने संस्थान श्रीदेव गणपतीपुळे च्या वतीने सायंकाळी साडेचार वाजता मंदिराच्या प्रदक्षिणामार्गे ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालखी मिरवणूकीत संस्थांनचे सर्व पंच मंडळी, पुजारी, कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, पोलीस व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या अंगारकी चतुर्थी निमित्ताने आलेल्या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठल्याही समस्या व तक्रारी उद्भवू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने डॉ. शंतनु वायकर व डॉ.मधुरा जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी अतिशय दक्ष राहून काम केले. एकूणच यात्रा उत्सव पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, गणपतीपुळे ग्रामपंचायत व संस्थान श्रीदेव गणपतीपुळे च्या सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय चोख व्यवस्थापन करून विशेष मेहनत घेतली. हा उत्सव पार पडला जात असताना रात्री चंद्रोदयानंतर भाविकांना दर्शनासाठी स्वयंभू गणेश मंदिर बंद करण्यात आले