(लांजा / प्रतिनिधी)
तालुक्यातील खोरनिनको साईबाबानगर येथे पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आलेल्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून अवघ्या चार महिन्यांतच या कालव्याच्या बांधकामाला तडे गेले आहेत. काही ठिकाणी तर हे बांधकाम तुटले देखील आहे. त्यामुळे या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या संपूर्ण प्रकरणाची शासनाने सखोल चौकशी करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ जयवंत माळकर यांनी केली आहे.
या बाबत ग्रामस्थ जयवंत माजळकर यांनी सांगितले की, खोरनिनको साईबाबानगर या ठिकाणी धरणग्रस्त ग्रामस्थांची वस्ती असून या वस्तीच्या दक्षिणेला पाटबंधारे विभागामार्फत कालवा काढण्यात आला होता. मार्च २०२४ मध्ये या कालव्याचे काम पूर्ण झाले होते. मात्र लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कालव्याला जागोजागी तडे गेले असून गळती लागली आहे. तर काही ठिकाणी कालव्याचे बांधकाम देखील फुटले आहे.
कालव्याच्या कामासाठी लाखो रुपये खर्च केले जात असतील आणि अवघ्या चार महिन्यांतच त्याची दुर्दशा होत असेल तर त्याला जबाबदार कोण? हे संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे झाले असून याची सखोल चौकशी व्हावी, अशी आपली मागणी आहे. यापूर्वी या ठिकाणी असलेले अभियंता स्वप्निल पुरी यांनी तर येथील ग्रामस्थांच्या जमिनीत दगड, मातीचे ढिगारे टाकून जमिनींची वाट लावली आहे.
या विरोधात मी कार्यकारी अभियंता पाटबंधारे बांधकाम विभाग रत्नागिरी जिल्हाधिकारी रत्नागिरी, लांजा तहसीलदार यांच्याकडे देखील वेळोवेळी पत्र व्यवहार केला आहे. मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता आपण पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे जयवंत माजळकर यांनी सांगितले.