(रत्नागिरी)
मंगळवारी रात्री रत्नागिरी तालुक्यातील भोके-मायंगडेवाडी येथे भरवस्तीत बिबट्या घुसला. त्याला येथील ग्रामस्थांनी पाहिल्यांनतर एकच गोंधळ उडाला. बिबट्या गावा शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सारेजण त्या दिशेने धावले. काहीजण लक्ष ठेवून होते. तेवढ्यात बिबट्या प्रेम मायंगडे यांच्या लाकडाच्या खोपटीत लपून बसल्याचे दिसून आले. बिबट्याला पळवून लावण्यासाठी अख्खा गाव धावू लागला. लोकांचा गोंधळ ऐकल्यानंतर बिबट्या काहीसा बिथरला होता; मात्र एक तासाच्या प्रयत्नानंतर त्या बिबट्याला जंगलाकडे पळवून लावण्यात ग्रामस्थांना यश आले.
मंगळवारी सायंकाळी भोके मायंगडेवाडीतील ग्रामस्थ रंगपंचमीचा आनंद घेऊन घरी परतलेले होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या डरकाळ्याचा आवाज काहींच्या कानावर पुसटसा पडला होता; मात्र ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वस्तीच्या मध्यभागी लाकडे ठेवण्याच्या छोट्याशा खोपटीत (खोली) बिबट्या लपून बसला होता. डरकाळ्यांच्या आवाजामुळे ग्रामस्थांकडून शोध सुरु झाला. बॅटरीच्या उजेडात बिबट्याचे डोळे चमकलेले दिसले. प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य होते, ‘अरे छोटा नाय, मोठा बिबट्या हाय रे’. त्याला मारायचं नाही, पळवून लावूयात असे एकमेकाला सांगत मायंगडेवाडीवासीय लाठ्या, काठ्या हातात घेऊन पुढे सरसावले. आरडाओरडा, ग्रामस्थांचा गोंधळ आणि बॅटर्यांचा उजेड यामुळे बिबट्या बिथरला. त्याने अचानक काळोखाच्या दिशेने झुडपात उडी मरली. अडचणीची जागा असल्यामुळे कुणालाच काही समजत नव्हते. सगळ्याच्या अंगावर भितीचा काटा आला.
काळोखामुळे कुठूनही बिबट्या हल्ला करु शकतो अशी भिती होतीच. बॅटर्यांच्या उजेडात पुन्हा शोधाशोध सुरु झाली. तेवढ्यात एका ग्रामस्थाला बिबट्याचे डोळे चमकताना दिसले. पुन्हा बिबट्याला पळवून लावण्यासाठी गावकर्यांनी प्रयत्न सुरु केले. हाकार्या देत, लाठ्या-काठ्यांचा आवाज करत ग्रामस्थ बिबट्याला पळवून लावण्यासाठी उचकवत होते. सुमारे एक तास हा थरार चालू होता. अखेर तो बिबट्या एका ग्रामस्थाच्या अंगणाच्या दिशेने उड्या मारत पळून गेला. त्यानंतर ग्रामस्थ त्या दिशेने धावू लागले.