(खेड / भरत निकम)
शहरातील कातळआळी येथील गांजा विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. प्रथमेश नरेंद्र कानडे (३२, रा. कातळ आळी, बाजारपेठ, खेड) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली असून पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक सुजित सोनावणे, हवालदार दीपक गोरे, रोहित जोयशी, शिपाई अजय कडू, वैभव ओहोळ यांनी ही कारवाई केली आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अमली पदार्थ विरोधी मोहीम राबविली असल्याने खेड शहरात रात्री अचानक गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक केल्यानंतर आज सकाळी श्वास पथकामार्फत कातळआळी परिसरातील घरांची तपासणी केली. तसेच संशयास्पद व्यक्तींच्या घराचीही श्वास पथकातर्फे तपास पूर्ण केला.
संध्याकाळी उशीरापर्यंत ही तपासणी मोहीम सुरु होती. खेड शहरातील बाजारपेठ, भरणे, भोस्ते, लोटे या भागात अमली पदार्थांची विक्री केली जात आहे. त्याशिवाय गुटखा विक्री सुध्दा जोमाने सुरु आहे. या धंद्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.