[ खेड/ तालुका प्रतिनिधी ]
शासनाच्या आदेशानुसार, १ जुलै २०२२ पासून एकल प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणाऱ्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार, मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान दुकानदारांकडून १४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नगर परिषदेने प्लास्टीक पिशव्यांचा वापर न करण्याचे आवाहन करत दंडात्मक कारवाईचे संकेतही दिले होते. मात्र, काही दुकानदार प्लास्टीकचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर, अभिजीत पाटील, वसुली विभागप्रमुख गंगाधर गायकवाड, राजेंद्र तांबे, सुबोध जाधव आदींनी कारवाई केली.
या पुढेही मोहीम सुरूच राहणार
या धडक मोहिमेंतर्गत काही दुकानदारांकडून प्लास्टीक जप्त करत १४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुढेही कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईने प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.