(खेड)
सप्टेंबर २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य योगासना स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने राज्यस्तरीय योगासन स्पर्धा निवड चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीमध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडची कु. प्रांजल प्रशांत आंबेडे हिची राष्ट्रीय योगासना स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय योगासना निवड चाचणी ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या निवड चाचणीकरिता संपूर्ण राज्यातील इतर विद्यार्थ्यांसमवेत समावेश होता. रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडची कु. प्रांजल प्रशांत आंबेडे ( इयत्ता ६ वी ) या विद्यार्थिनीने आपला सहभाग नोंदवला होता. योग कौशल्यातील आपली कसब, सातत्य आणि आपल्या शाळेतील प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर तिने या निवड चाचणीमध्ये यशश्री खेचून आणली.
कु. प्रांजल आंबेडे हिने ९ ते १४ वर्षे वयोगटामध्ये ट्रेडिशनल सब ज्युनियर योगा गटामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. कु. प्रांजल हिची दिनांक २६ मे ते २८ मे २०२२ दरम्यान कोलघाट, वेस्ट बंगाल येथे होणाऱ्या राष्ट्रीय योगासना स्पर्धेकरिता निवड झाली आहे. प्रांजल हिने मिळवलेल्या या यशामुळे सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कु. प्रांजल हिला योगप्रशिक्षक श्री. गौरव आंब्रे व सौ. शितल बारस्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे चेअरमन मा. बिपीन पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रांजल हिचे कौतुक करून तिला राष्ट्रीय योगासना स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.