( मुंबई )
मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. खिचडी घोटाळाप्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्यासह १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेच्या कथित डेड बॉडी प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ््यातही आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, महापालिकेचे तत्कालीन सहा. आयुक्त, नियोजन, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधित खासगी लोकांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेने भादंवि कलम ४०६, ४०९, ४२० आणि १२० ब तसेच ३४ प्रमाणे हा गुन्हा आग्रीपाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण सुमारे ६.३७ कोटी रुपये असल्याचे तपासात समोर आले आहे. खिचडी घोटाळ््यात आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास सुरू केला आहे. कथित खिचडी घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या नियोजन विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांचाही आर्थिक गुन्हे शाखेने जबाब नोंदवला होता.
संगीता हसनाळे यांचासह हेड क्लर्क प्रदीप लोंढे यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. संगीत हसनाळे नियोजन विभागाच्या इन्चार्ज असल्याने खिचडीच्या टेंडरच्या फाईल्स त्यांनी हाताळल्या होत्या. सह्याद्री रिफ्रेशमेंटला कोटींचे खिचडीचे टेंडर देण्यात आले होते. यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.