(खेड / इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील आणि लोटे एमआयडीसी क्षेत्रातील हवा प्रदूषण रोखण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करणारी, राज्यातील एकमेव पहिली मॉनिटरिंग सिस्टिम सीईटीपीमध्ये दाखल झाली आहे. या कामी सीईटीपी प्रकल्पाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश वाघ यांच्या प्रयत्नाने एमआयडीसी प्रदूषणमुक्त होणार आहे. त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत.
प्रदूषणाच्या मुद्यावरून गेले अनेक वर्षे चर्चेत असलेली सामुदायिक सांडपाणी प्रकल्प म्हणजेच सीईटीपीचे सुत्र उद्योजक, डॉक्टर सतीश वाघ यांनी आपल्या हातात घेतल्यानंतर येथील लोटे-परशुराम औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. डॉक्टर वाघ यांनी प्रथम उद्योगांमधून येणारा घनकचरा रोखण्यासाठी प्रयत्न केले. त्याचे अनुकरण महाराष्ट्रातील सर्वच एमआयडीसी मधील रासायनिक उद्योगांना करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र नियंत्रण मंडळ यांच्या निर्देशानुसार डिस्चार्ज करणाऱ्या प्रत्येक रासायनिक उद्योगाचे काम प्रगतीपथावर आहे. आता नदीपात्रात मासे दिसू लागले आहेत. मध्यंतरी जगबुडी व वाशिष्ठी नदी पात्रात जलप्रदूषणामुळे मासे मरण्याचे प्रमाण वाढले होते. परंतु डॉक्टर वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या परिसरातील गावांमधील जनतेशी संवाद साधून आणि खाडीत जाणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवून प्रदूषणाला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी आता नदीमध्ये मासे पाहायला मिळत आहे. ही संकल्पना डॉक्टर सतीश वाघ यांच्या प्रेरणेतून सामाजिक बांधिलकीतून आणि उद्योजकांच्या सहकार्यातून मार्गी लागली. डॉ. वाघ यांच्या प्रदूषण मुक्त मॉनेटरिंग सिस्टमचे कौतुक राज्यभरातून करण्यात येत आहे.