(देवरूख / सुरेश सप्रे)
श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय कोसुंब या प्रशालेतील मुलींनी जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात खेड तालुक्याला पराभूत करून अंतिम विजेतेपद पटकाविले. या संघाची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.
नवभारत हायस्कूल भरणे-खेड या ठिकाणी झालेल्या 17 वर्षे मुली या गटात हे यश मिळवले. कर्णधार समृद्धी पातेरे, सिद्धी खाके, दिया भोपळकर, श्रुती जाधव, तन्वी धामणे, स्नेहल धामणे, अक्षता खाके, पूर्वा धने, भारती नटे, सुविधा पानगले या खेळाडूंचा या संघात समावेश होता. समृद्धी पातेरे हिने अष्टपैलू कामगिरी केली. त्यात तिला श्रुती जाधव आणि सिद्धी खाके यांची उत्तम साथ मिळाली.
उपांत्य फेरीमध्ये कोसुंबच्या संघाने रत्नागिरी संघाला पराभूत केले. या सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक देविदास कुळ्ये यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष नामदेव जाधव, मुख्याध्यापक राऊत व सर्व शिक्षक, यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रशालेतील अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील असून त्यांना मिळालेल्या मार्गदर्शनामुळे ते विभाग स्तरापर्यंत पोहोचले आहेत, असे अध्यक्ष नामदेव जाधव यांनी सांगितले.