(कोल्हापूर)
आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एक खळबळजनक विधान केले आहे. समाजातील गुन्हेगारीच्या घटना रोखायच्या असतील तर, एखादा गुन्हेगार गुन्हा करत असल्यास त्याला पोलिसांनी समोर गोळ्या घालाव्यात, असे विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. पुणे- बंगळुरु महार्गावरील कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलाच्या कामाचा आढावा उदयनराजे भोसले यांनी घेतला यावेळी ते बोलत होते.
त्यावेळी ते म्हणाले की, आपल्या कायद्यात भरपूर पळवाटा आहेत. १६ ते १८ वयाच्या आतील गुन्हेगार मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुन्हा केल्यानंतर त्यांना बालसुधारगृहात ठेवले जाते. नंतर ते तेथून सुटतात. यावर माझं म्हणणं आहे की, एखाद्याला जर संपवायचं असेल तर पुढं मागं न बघता डायरेक्ट गोळी घालून मोकळं व्हायचं. असे जोपर्यंत केले जात नाही तोपर्यंत समाजात गुन्हेगारी घटना होतच राहतील, ती थांबणार नाही.
उदयनराजे भोसले म्हणाले की, समाजातील वाढती गुन्हेगारी कशी थांबवणार? महिलांवर होणारे अत्याचार कशा थांबवणार? कारण वकील मंडळी भरपूर आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर मी स्वतः एखादा गुन्हा केला, नंतर मी चांगला वकील देणार आणि सुटणार. दुसरीकडे ज्यांच्यावर अत्याचार झाला आहे ते पोलिसात धाव घेतात. मात्र तेथे पोलीस त्यांच्यावरच गुन्हा नोंदवतात, असं ते म्हणले.