(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
गणेशोत्सवासाठी दिवा ते रत्नागिरी मार्गावर प्रथमच सुरू करण्यात आलेल्या जादा मेमू गाडीच्या फेऱ्या २ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत. संपूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे मुंबईकडे जाताना आणि तेथून रत्नागिरीकडे येताना आरक्षित तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
नियमित गाड्यांसह यापूर्वी जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे गणपती उत्सवातील आरक्षण फुल्ल झाल्यामुळे मध्य रेल्वेने यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्यांच्या फेऱ्या जाहीर केल्या. त्यानुसार २०२३ मधील गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकण रेल्वेमार्गावर रत्नागिरीपर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी चालवण्यास सुरवात केली आहे. या आधी गणेशोत्सवात डेमू तसेच मेमू स्पेशल गाडीचा प्रयोग चिपळूणपर्यंतच करण्यात आला होता. त्यापुढे मेमू स्पेशल गाड्या चालवल्या जात नव्हत्या. मात्र, यावर्षीच्या गणेशोत्सवात कोकण रेल्वे तसेच मध्यरेल्वेकडून दिवा ते रत्नागिरी मार्गावर प्रथमच मेमो स्पेशल गाड्या चालवल्या.
१३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत रत्नागिरी स्थानकापर्यंत प्रथमच मेमू सोडण्यात आली. मेमू गाडीसह कोकण रेल्वे आणि मध्यरेल्वेच्या सहयोगाने गणेशोत्सवासाठी गणपती विशेष गाड्यांच्या अन्य फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोकणवासीयांना यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुरेपूर गाड्या सोडल्या जातील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार रेल्वेने गणेशोत्सवातील या आधीच्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्यांच्या आणखी फेऱ्या जाहीर केल्या आहेत.
यंदा प्रथमच दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावणारी मेमू स्पेशल गाडी धावणार आहे. १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत या गाडीच्या ३९ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी दररोज सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी दिवा स्थानकातून रत्नागिरीला सुटेल. ती दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी ती दिवा जंक्शनला पोहोचेल. ही गाडी रोहा, माणगाव, वीर, सापे वामने, कारंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, कडवई संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबे घेते. यंदाच्या गणेशोत्सवात रत्नागिरीपर्यंत प्रथमच धावणाऱ्या गणपती स्पेशल मेमू गाडीला एकूण १२ डबे जोडण्यात आले आहेत.