(मालगुंड / वैभव पवार)
कोकणातील साहित्यिकांसाठी आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या आणि मागील ३१ वर्षे सातत्याने साहित्यिक क्षेत्रात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदचा वर्धापन दिन पुढील वर्षापासून दोन दिवसीय साहित्य संमेलनाने साजरा करणार असल्याचा मनोदय कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांनी व्यक्त केला. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड आणि कवी केशवसुत स्मारक मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडच्या अध्यक्षा नलिनी खेर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेचा ३१ व्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सर्वप्रथम प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर कवी केशवसुत यांचे समकालीन कवींच्या कवितांचे वाचन व अभिवाचन सादर करण्यात आले. याप्रसंगी झालेल्या सादरीकरणात गोगटे जोगळेकर महाविद्यालय, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड, आणि साहित्यप्रेमी यांनी सहभाग नोंदवत सादरीकरण केले. यावेळी उपस्थित कोमसाप केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांनीही कोमसापच्या कार्याचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला युवाशक्ती जिल्हाध्यक्ष अरुण मोर्ये, मालगुंड शाखा कार्याध्यक्ष शुभदा मुळ्ये, जिल्हा मराठी भाषा संवर्धन समितीचे सदस्य गोपाळेसर, रामानंद लिमये, उज्ज्वला बापट, नितीन कानविंदे, दिप्ती कानविंदे, डॉ. निधी पटवर्धन, वैभव पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय धोपटकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुमार डांगे, स्वप्नेश राजवाडकर यांच्यासह स्मारक व्यवस्थापन समिती कर्मचारी यांनी प्रयत्न केले.