(गणपतीपुळे / वैभव पवार)
संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वपक्षीय मिळून बनलेल्या सहकार पॅनेलच्या माध्यमातून इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातुन बिनविरोध निवडून आलेले रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे संचालक गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांचा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देत सन्मान करण्यात आला. सदर पुरस्काराचे नियोजन मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील मयेकर आणि मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा श्री गणपतीपुळे देवस्थानचे सरपंच विनायक राऊत यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
गजानन पाटील हे मागील अनेक वर्षे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी आणि व्यापारी यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याने त्यांची निवड झाल्याने सर्वच स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील मयेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच याच पंचवार्षिक निवडणुकीत मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे संचालक रोहित दिलीप तथा नानासाहेब मयेकर यांचाही विजयी झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुनिल मयेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या सत्काराला उत्तर देताना गजानन पाटील यांनी सांगितले की, मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आलेला सन्मान खूप मोठी बाब आहे. घरातील हा सन्मान भविष्यात काम करण्यास प्रेरणा देणारा असून नामदार उदय सामंत, भैय्याशेठ सामंत आणि डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्य सर्वदूर नेण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी संस्थाध्यक्ष सुनील मयेकर यांनी शुभेच्छा देत गजानन पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत या निवडीने आनंद झाल्याचे सांगितले तर सचिव विनायक राऊत यांनीही याप्रसंगी शुभेच्छा दिल्या. या सन्मान सोहळ्याचे सुंदर निवेदन जाधव यांनी केले. यावेळी संस्थेचे सचिव विनायक राऊत यांच्यासह सर्वच संचालक मंडळ, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.