( लांजा )
लांजा तालुक्याच्या पूर्व भागात वसलेल्या कुरंग गावाकडे जाण्यासाठी नावेरी नदी ओलांडून जावे लागते. यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पुल मोडकळीस आला असून तो धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात नावेरी नदीला असणाऱ्या पुराचे प्रमाण पाहता हा पूल वाहून जाण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत या ठिकाणी नदीवर नव्याने पूल बांधण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कुरंग ग्रामस्थांतून केली जात आहे. तर नावेरी नदीवर कुरंग या ठिकाणी पूल बांधण्यासाठी ९मार्च २०१९ ला नाबार्ड मधून पुलासाठी एक कोटी ११ लाख ५४ हजार इतका निधी मंजूर झाला होता. मात्र त्यानंतर आजतागायत गेली तीन वर्षे हे काम रखडलेल्या स्थितीत आहे.
तर पुलासाठी निधी मंजूर होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला तरीही कुरंग येथील नावेरी नदीवरील पुलाचे काम अद्यापही रखडलेलेच आहे. प्रशासनाच्या या चालढकल आणि दिरंगाईच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून पुढील काही दिवसात या पुलाचे कामाला तातडीने सुरुवात न झाल्यास येत्या १२ एप्रिल रोजी प्रशासनाच्या विरोधात नावेरी नदीपात्रातच उपोषण करण्याचा इशारा कुरंग ग्रामस्थ आणि ग्रामसेवा संघ यांच्या वतीने देण्यात आला आहे.
या पुलाच्या कामाबाबत आपण संबंधित विभागाकडे अहवाल मागवला असता त्यांच्याकडून ४८ लाखाचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र जागेवर काहीच काम झाले नसताना काम कुठे झाले आहे ? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. १६ मे २०२२ रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाकडून पुलाचे काम सद्यस्थितीत करता येणे शक्य नसल्याने नोव्हेंबर २०२२ मध्ये कामाला सुरुवात करून मार्च २०२३ अखेर हे काम पूर्णत्वास जाईल असे लेखी आश्वासन यावेळी देण्यात आले होते. मात्र मार्च महिना संपत आला तरी पुलाच्या कामाचा काहीच पत्ता नाही.
या पुलावर ८० टक्के कुरंग गाव अवलंबून आहे गावातील सहा वाड्या तसेच तरेश रेशन, आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायत या सर्वांसाठी हा पूल अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हे काम रखडले आहे. आणि म्हणूनच पुढील काही दिवसात या पुलाचे काम तातडीने हाती घ्यावे अन्यथा काम सुरू न झाल्यास येत्या १२ एप्रिल पासून नावेरी नदी पात्रातच सर्व ग्रामस्थ आणि कुरंग ग्रामपंचायत सरपंच, सदस्य हे उपोषणास बसणार असल्याचा इशारा कुरंगचे सरपंच तानाजी जाधव आणि कुरंग ग्रामसेवा संघ मुंबईचे अध्यक्ष मयुरेश कदम, उपाध्यक्ष स्वप्निल लाड, प्रसाद कदम यांनी दिला आहे.