(मुंबई)
तंबाखू खाण्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. याबाबत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गावागावांत जनजागृती केली जाते. तरीदेखील काहीजण नियम धाब्यावर बसवून तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. महाराष्ट्रात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे. आता राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबतचा आदेश काढला आहे. यामुळे तंबाखूचे व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन असलेल्या लोकांची आता चांगलीच पंचाईत होणार आहे. सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेत सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे. जर कोणी तंबाखूचे सेवन केल्याचे आढळल्यास तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाणे, तसेच धूम्रपान करणे यावर बंदी आहेच. आता शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, शासकीय संस्था, कार्यालयातील कामाच्या जागा, उपाहारगृहे, शाळा व महाविद्यालये या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ खाणे, थुंकणे, धूम्रपान केल्यास २०० रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा जीआर काढला आहे.
शाळांपासून गावागावांत, सरकारी कार्यालयांत ठिकठिकाणी माहिती फलकाद्वारे प्रबोधन करण्यात येत असते. तंबाखूसह धुम्रपानामुळेही आरोग्यावर परिणाम होत असल्याने जनजागृती करण्यात येत आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. आता तंबाखूवर बंदी आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एखाद्या व्यक्तीवर सोपवण्यात येणार आहे. अशा व्यक्तीची नेमणूक करण्याचे आदेशही प्रत्येक सरकारी आणि खासगी कंपन्यांतील कार्यालयांना आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. स्वच्छ भारत, स्वस्थ भारत अभियानांतर्गत राज्यात ही मोहिम राबवण्यात येणार आहे.
भारतामध्ये दरवर्षी ८ ते ९ लाख मृत्यू हे तंबाखू सेवनामुळे होत असतात. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याने तसेच थुंकण्याने विविध आजारांचा फैलाव होत असतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणे तसेच धूम्रपान करण्यास बंदी आहेच. पण आता या ठिकाणी ही उत्पादने वापरल्यास २०० रूपयांचा दंडही ठोठावण्यात येणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने काढलेल्या नव्या आदेशानुसार सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
शासकीय कार्यालये व परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी इतरही उपाययोजना करण्यात येणार आहेत. शासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यासंबंधीची सर्व माहिती देणारा फलक देखील लावण्यात येणार आहे.