[ रत्नागिरी /प्रतिनिधी ]
रत्नागिरी शहराकडे जाणाऱ्या कारवांचीवाडी ते साळवी स्टॉप या भागात मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा वावर पाहायला मिळत आहे. पंधरा ते वीस जनावरे समूहाने एकत्र फिरत असतात. बऱ्याच वेळेस रस्त्यावरच ठाण मांडून बसतात. या जनावरांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असते. रत्नागिरी नगर परिषदेकडून मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी कुठलीही मोहीम राबवली जात नसल्याचे वास्तव चित्र आहे. त्यामुळे मोकाट जनावरे व कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
विकासाच्या प्रगतीकडे झेपावणाऱ्या व स्मार्ट सिटीत गणल्या जाणाऱ्या रत्नागिरीत काँक्रीट रस्त्यावरच्या खड्डेनी तर दुसरीकडे रस्त्यावरच्या मोकाट जनावरे व कुत्रे उभी राहत असल्याने पादचाऱ्यांसह वाहनचालक त्रस्त आहेत. वाहनधारकांना रस्त्यावरून गाडी चालवण्यास अडचणींचा सामना करावा लागतो. कारण ही मोकाट जनावरे अचानकच वाहनधारकांकडे आपला मोर्चा वळवतात.
पूर्वीच्या तुलनेत आता रत्नागिरी शहरात खड्ड्यामध्ये प्रवास करण्याची सवयच वाहनधारकांना असल्याने वाहन चालक ही जनावरांकडे दुर्लक्ष करत असतात. मात्र कारवांचीवाडी ते साळवी स्टॉप या भागात दिवसेंदिवस मोकाट जनावराची आणि कुत्र्यांची संख्या वाढताना दिसत आहे. शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोकाट व पाळीव जनावरांमुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्रवाशांना व शहरात खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांना देखील या प्राण्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या मोकाट जनावरांना नियंत्रित करण्याचं काम असणाऱ्या रत्नागिरी नगर परिषदेकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. रत्नागिरी तालुक्यात 193 खेडे असून यापैकी एकाही ठिकाणी मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकण्याची व्यवस्था नाही. नगर परिषदेकडून मोकाट जनावरांच्या विरोधात त्वरित ठोस कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांकडून आता केली जात आहे.