(रत्नागिरी)
कायद्याच्या अभ्यासात धर्मशास्त्राचा समावेश करण्याचे निवेदन राज्यपालांना देणार असल्याची माहिती कवीकुलगुरु कालिदास विश्वविद्यालयाचे कुलगुरु डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी दिली. तसेच विश्वविद्यालयाचे डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र धर्मशास्त्राविषयी नवनवीन उपक्रम चालू करणार आहे. तसेच धर्मशास्त्रावरील अप्रकाशित हस्तलिखीतांचे प्रकाशन आणि नियमित व्याख्याने, चर्चासत्रे आणि परदेशी संस्थांसोबत सामंजस्य करार करण्याची घोषणाही त्यांनी केली. धर्म, धर्मशास्त्र आणि संस्कृती या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सांगता कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र व गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय परिषद झाली. ते म्हणाले की, ही परिषद फेब्रुवारीमध्ये घ्यायची होती. परंतु नंतर ऑनलाइन व आता ऑफलाइन परिषदेचे नियोजन केले. धर्मशास्त्राचा अभ्यास करून आपण तक्षशिला, नालंदा पुन्हा निर्माण करण्यासाठी काही पावले चालूया. स्मृतीग्रंथांमध्ये माणसाच्या जीवनातील धर्म सांगितला आहे. तो कोणीही टाळू शकत नाही. आपल्या पाठीवर धर्माची झोळी आहेच. ती काढली तर अधर्म होईल. कालिदास विश्वविद्यालयाला २५ वर्षे झाली असून पुढील २५ वर्षे काय करायचे हे सांगू शकतो. हे विश्वविद्यालय निश्चित इतिहास रचणार आहे. धर्माशिवाय भारतीय संस्कृती नाही. परिषदेतून बौद्धिक खाद्य नेले पाहिजे. रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांची स्तुती करून त्यांनी पारदर्शक कारभार, मेहनत यामुळे ही परिषद यशस्वी झाली. याशिवाय विविध संस्थांचेही आभार डॉ. पेन्ना यांनी मानले.
कार्यक्रमात व्यासपीठावर या वेळी र. ए. सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे, प्र. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उज्जैन येथील महर्षि पाणिनी संस्कृत वैदिक विश्वविद्यालयाचे विजयकुमार मेनन, पुणे विद्यापीठाचे कुलपती डॉ. रवींद्र मुळ्ये, गोगटे कॉलेजच्या संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये आणि संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे उपस्थित होते. परिषदेतील अनुभव वरुण रानडे, प्रणाली वायंगणकर, कोकिला कालेकर आणि पैय्या लोक यांनी सांगितला. याप्रसंगी अनघा जोशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय परिषदेची संधी कवी कुलगुरु कालिदास विश्वविद्यालय, डॉ. काणे अध्ययन उपकेंद्रामुळे मिळाली. संस्कृत म्हणजे संस्कार. संस्कृत विभाग चांगल्या प्रकारे काम करत आहे. यापुढेही अशा उपक्रमात उपकेंद्रासोबत संस्था, कॉलेज सहभागी असेल अशी ग्वाही कार्यवाह सतीश शेवडे यांनी दिली. तसेच डॉ. साखळकर यांनीही मनोगतामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेबद्दल कौतुकोद्गार काढले.