(मुंबई / प्रमोद कांदळगावकर)
दर्याचा राजा दिवाळी अंकाचे प्रकाशन सोहळा अत्यंत विशेष आणि खास आहे. आपल्या आवडी निवडी जपत गेल्या 15 वर्षांच्या प्रवासात सामाजिक, राजकीय, आर्थिक, शेती, मनोरंजन, क्रीडा थोडक्यात आपल्या सर्वांच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक विषयाशी निगडीत वैशिष्ट्यपूर्ण लेखन आपल्यापर्यंत दर्याचा राजाने वेळोवेळी पोहोचवले. दिवाळी अंकाच्या लेखन-वाचन संस्कृतीचे पाईक होत, दर्याचा राजाचा हा दिवाळी अंक प्रेक्षकांच्या वाचकांच्या हाती ठेवत दिवाळी अंकांच्या समृद्ध परंपरेच्या प्रवाहात ही छोटीशी ओंजळ वाहण्याच्या प्रयत्नाचं महाराष्ट्र नक्की स्वागत करेल. दर्याचा राजा दिवाळी अंक एक आदर्श अंक आहे. या अंकात मधु मंगेश कर्णिक, डॉ. विजया वाड उषा मेहता, रत्नकर मतकरी या मान्यवरांच्या साहित्याबरोबर नवोदितांचे असे शंभर लेखक कवींचे दिवाळी साहित्य संमेलन भरून वाचकांना साहित्य फराळ पुरविले आहे. या दिवाळी अंकाचे मी मनापासून स्वागत व अभिनंदन करतो, असे गौरवोदगार सुप्रसिद्ध कवी गीतकार, गझलकार सदानंद डबीर यांनी दर्याचा राजा दिवाळी अंक २०२२ विशेषांकाचे प्रकाशन करताना काढले
प्रारंभी दर्याचा राजाचे संपादक श्री. पंढरीनाथ तामोरे यांनी शाल श्रीफळ आणि पुष्प करंडक देऊन सदानंद डबीर यांचा यथोचित सत्कार केला आणि पंधरा वर्षाच्या दर्याचा राजाचे यशस्वी वाटचालीचा आढावा सादर केला
सदर प्रकाशन सोहळ्यात महाराष्ट्र राज्य माजी मत्स्य आयुक्त विनोद नाईक, कवी वसंत तांडेल, समाजसेवक जयवंत गावडे, सहसंपादक प्रवीण वैद्य, मांगेला समाज माहीमगाव शाखा अध्यक्ष अविनाश तांडेल, महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे कार्यवाह अँड. सुनील शिर्के यांनी दर्याचा राजाच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सदानंद डबीर यांच्या पत्नी सौ मृण्मयी सदानंद डबीर, समाजसेवक प्रकाश धनु फोटोग्राफर रामदास तांडेल उपस्थित होते कार्यकारी संपादक जनार्दन पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. सदानंद डबीर यांनी गायलेल्या गीत गझल कार्यक्रमाने प्रकाशन समारंभास एक वेगळीच उंची लाभल्याने टाळांच्या कडकडात कार्यक्रमाची सांगता झाली.