(संगलट-खेड/इक्बाल जमादार)
कवीचे अंतरंग दुसर-तिसर काहीही नसुन कवीच्या कविता असतात, असे प्रतिपादन कवी व प्रसिद्ध गीतकार अरुण म्हात्रे यांनी केले. कवी हा एक संवेदनशील माणूस असल्याने साध्या साध्या गोष्टी सुद्धा त्रासदायक ठरतात. कविता समजण्यासाठी कवीचे चरित्र कळावे लागते. ते शहरातील द.ग.तटकरे सभागृहात रविवार ता.22 मे रोजी सौ.रुपाली पाटील यांच्या ‘गंधावल्या वृक्षसावल्या’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
या सोहळ्याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव व धर्मादाय सहआयुक्त कार्यालय, कोल्हापुर चे अधिक्षक शिवराज नाईकवडे, दापोलीतील पा.वा.काणे स्मारक समितीचे अध्यक्ष प्रशांत परांजपे, खेड कोमसापचे तालुकाध्यक्ष विमलकुमार जैन, कार्याध्यक्ष विनय माळी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर साळवी, उत्तमकुमार जैन, मोहन पाटील यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी कवी अरुण म्हात्रे पुढे म्हणाले, कोकणात प्रवेश होणारे खेड हे एक छोटे शहर आहे. मुळातच कोकणात प्रतिभा असल्याने कोकणातून विशेषता खेड-दापोलीतून प्रतिभावंत कवी निर्माण होत आहेत. कोकणामध्ये कोल्हापुरहून अनेक व्यक्तीमत्व आलेली आहेत. वि.स.खांडेकर, ना.सी.फडके आदींच्या साहित्यीक लेखणीने समुद्ध झालेला हा भाग आहे. खेडमधील कोमसापच्या प्रेरणेने कवयत्री सौ.रुपाली पाटील यांच्या काव्यसंग्रहाचे आज प्रकाशन झालेले आहे. याच काव्यसंग्रहापासून त्यांनी आपल्या खर्या साहित्यीक कारर्किदीला सुरवात केली आहे. आरती प्रभू, मंगेश पाडगावकर, सुदेश मालवणकर, कैलास गांधी या कवींच्या काही कवितांचे वाचन करताना त्यांनी कवीतेचा सन्मान कशा प्रकारे होतो, हे दाखवून दिले आहे. कवीता सगळी काव्यत्कमता रुजविण्याचे काम करते. कवितेच्या माध्यमातून निर्माण होणार्या संस्कारातूनच ग.दी.माडगूळकर यांनी गोमू माहेरला जाते ग नाखवा हे कोकणातले गाणे लिहले.
कवियत्री रुपाली पाटील या न्यायालयात नोकरी करीत आहेत. न्यायालयातल्या वृक्ष वातावरणातही त्याची कविता टिकून राहीली हे फार महत्वाचे आहे. अंतरीच्या भावना कवितेमध्ये येतात, दुःखामध्ये शब्दांच्या जवळ जाता येते. पण आनंदात लांब राहून आपले गाणे मनातल्या मनात म्हणता येते. आईच्या कविता या मनापासून दाद देतात. कारण त्यात मायेचा ओलावा असतो. याबाबत त्यांनी अनेक उदाहरणे दिली.
यावेळी कोल्हापूरच्या माजी महापौर सौ. सुलोचना नाईकवडे, शिवराज नाइकवडे, विमलकुमार जैन, प्रशांत परांजपे यांनी आपली मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.पौर्णिमा पवार व अमोल गुहागरकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री.तांबे यांनी केले.
फोटो :- सौ. रुपाली पाटील यांच्या गंधावल्या वृक्षसावल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना मान्यवर तर दुस-या छायाचित्रातकवी व प्रसिद्ध गीतकार अरुण म्हात्रे यांचा कार्यक्रमप्रसंगी सत्कार करताना मोहन पाटील सोबत व्यासपिठावर अन्य मान्यवर
(छाया: इक्बाल जमादार -संगलट खेड )