(फुणगूस / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील रेल्वे स्थानकातील अनेक समस्यांच्या विरोधात मनसेच्या वतीने आज सोमवार दिनांक २२ मे २०२३ रोजी कडवई रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. यामध्ये दिवा सावंतवाडी गाडीला कडवई स्थानकात थांबा मिळावा, रेल्वे प्लॅटफॉर्म ची उंची वाढवणे, प्रवाशी निवारा शेड ची व्यवस्था करणे, पाण्याची सुविधा करणे तसेच स्थानकाजवळील घरांच्या सुरक्षेसाठी संरक्षण भिंत बांधणे अशा अनेक मागण्यांचे निवेदन क्षेत्रिय रेल्वे प्रबंधक रत्नागिरी यांना देण्यात आले होते. या मागण्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर आज सकाळी ११ वाजल्यापासून हे आंदोलन सुरू करण्यात आले. मात्र दुपारी कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक यांच्यावतीने लेखी सकारात्मक आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मनसेच्या आंदोलनाच्या माध्यमातून जनआंदोलन छेडलयानंतर कडवई रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यात आली. मात्र स्थानक सुरू होऊन दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतरही अनेक त्रुटी दिसून येतात. सध्या फक्त एकच पॅसेंजर गाडी इथे थांबत असून दिवा सावंतवाडी गाडी थांबत नसल्याने या दशक्रोशीतील प्रवाशांची फार मोठी अडचण होत आहे.
या स्थानकात प्रवाशांना उतरण्यासाठी प्लॅटफॉर्मच नसल्याने गाडी थांबूनही प्रवाशांना त्याचा उपयोग होत नाही. प्रवाशांना उभे रहाण्यासाठी प्रवाशी निवारा शेडची पुरेशी व्यवस्था नाही. पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. कडवई स्थानकावर डाऊनच्या दिशेने मोठा फलक नसल्याने प्रवाशांची गफलत होत आहे. प्लेटफॉर्मच्या लगत धामनाकवाडी येथील घरे असून फलाटांचे काम करताना माती उतख्तनन केल्याने या घराना धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी कोणतीही सुरक्षा उपाययोजना नसल्याने धोका निर्माण झाला आहे. अशा अनेक समस्या असज या स्थानकाला भेडसावत आहेत.
याकडे लक्ष वेधत मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रत्नागिरी याना लक्ष निवेदन सादर केले आहे. यामध्ये दिवा सावंतवाडी (५०१०५) या गाडीला तात्काळ कडवई येथे थांबा मिळावा या प्रमुख मागणीसह रेल्वे प्लेटफर्मची उंची वाढवावी ही मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रवाशी निवारा शेड बांधण्यात याव्या व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी या मागण्याही करण्यात आल्या आहेत. तसेच प्लॅटफॉर्मच्या बाजूला धामनाक वाडी लगत संरक्षण भिंत बांधण्यात यावी व डाऊनच्या दिशेने कडवई नावाचा मोठा फलक लावण्यात यावा अशा अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या.
मात्र याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने सकाळी ११ वाजल्यापासून कडवई रेल्वे स्थानकात मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थाच्या वतीने ठिय्या आंदोलन छेडले. या आंदोलनात रिक्षा संघटनेसह विविध पक्षाच्या लोकांनी सहभाग घेतला होता.
कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक हे मान्सून उपाययोजनेच्या कामासाठी रोहा येथे गेले असल्याने त्यांच्या वतीने जनसम्पर्क अधिकारी सचिन देसाई यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन झालेल्या कार्यवाही बद्दल माहिती दिली. यातील क्षेत्रीय स्तरावरील ज्या मागण्या होत्या त्यांची पूर्तता करण्यास सुरुवात झाली असून ज्या मागण्या वरिष्ठ पातळीवरून पूर्ण होणार आहेत त्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे सांगितले. यासाठी आठच दिवसात क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक यांच्या सोबत जितेंद्र चव्हाण आणि प्रमुख ग्रामस्थाची बैठक लावून चर्चा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. यामध्ये दिवा सावंतवाडी गाडीला थांबा मिळणे व प्लॅटफॉर्म बनवणे या दोन प्रमुख मागण्या आहेत . प्लॅटफॉर्म साठी सव्वा कोटी निधीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.
अशाप्रकारे सकारात्मक चर्चेनंतर लेखी पत्र दिल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले. या मागण्यांवर दोन महिन्यात सकारात्मक कार्यवाही न झाल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा ही चव्हाण यांनी दिला. सदानंद ब्रीद, रामचंद्र किंजलकर ,हरिश्चंद्र मोहिते, सचिन उजगावकर, संजय धामनाक, जितेंद्र महाडिक, सुरेश कुंभार, बापू कदम, गणपत पवार, वसंत उजगावकर, शिवराम गीते, सुभाष धामनाक, मोहन कुंभार मनसेचे उपतालुकाध्यक्ष उदय घाग, नंदकुमार फडकले यांच्यासह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .
फोटो – ठिय्या आंदोलनास उपस्थित ग्रामस्थ.