(नागपूर)
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वाधार सारखी योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी किमान ५ वसतिगृह सुरू व्हावीत, यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून लवकरच ती सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी विधानसभेत सांगितले.
उपमुख्यमंत्री पुुढे म्हणाले की, स्वाधारसारखी योजना आता ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुरू करत आहोत. विद्यार्थ्यांच्या राहण्याचा, जेवणाचा आणि शिक्षणाचा खर्च त्यांच्या बँक अकाउंटला डीबीटीद्वारे पाठवला जाणार आहे. याचा फायदा ३१ जिल्ह्यांतील ६०० विद्यार्थ्यांना होणार आहे. पीएचडीसाठी अनुसूचित जाती, मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. आता अशीच फेलोशिप आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ओबीसी वसतिगृह खासगी संस्थांना नव्हे तर स्वयंसेवी संस्थांना चालविता येणार आहे. अशा प्रकारची योजना समाजकल्याण खात्यामार्फत सुरू आहे. विधानसभेत चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्वाधारसारखी योजना सुरू केली होती आणि ही योजना शिंदे-फडणवीस सरकारने बंद केली असल्याचा आरोप केला होता. मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भुजबळ यांचे हे आरोप फेटाळून लावले.
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना” ही महाराष्ट्र शासनाने २०१६-१७ मध्ये सुरू केलेली एक शैक्षणिक योजना आहे. इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून दिले जाते.