(मुंबई)
एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच चार हजार नव्या गाड्या दाखल होणार आहेत. यात सीएनजीऐवजी दोन हजार डिझेल गाड्या घेण्यात येणार आहेत तर दोन हजार इलेक्ट्रीक गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.
राज्य परिवहन मंडळाच्या संचालक मंडळाची ३०२ वी बैठक २८ ऑक्टोबरला मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. चार हजार गाड्यांबरोबरच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २८ टक्क्यांवरुन ३४ टक्के करण्याच्या निर्णयाला देखील या बैठकीत मंजुरीची शक्यता आहे.
दर तीन महिन्याला ही बैठक नियमितपणे पार पडत असते. मात्र, सत्तांतरामुळे चार महिन्यांनंतर ही बैठक पार पडणार आहे. कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आणि गाड्या कमी अशी अवस्था महामंडळाची झाली आहे. त्यामुळे चार हजार नव्या गाड्यांबाबतचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. एसटी कर्मचार्यांचा महागाई भत्ता २८ टक्क्यांवरुन ३४ टक्के करण्याच्या निर्णयाला देखील मंजुरीची शक्यता आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हाती अधिकचे पैसे मिळू शकतील.