(मुंबई)
तब्बल १.५४ लाख कोटी रुपयांच्या प्रचंड गुंतवणुकीसह महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला महत्त्वाकांक्षी वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातला गेला जात आहे. एकनाथ शिंदे सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण या प्लांटमधून राज्यातील एक लाख कुशल तरुणांना नोक-या मिळणार होत्या. वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. ही कंपनी थेट गुजरातला पळविली गेल्याने शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीने राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कंपनीसोबत तीनवेळा बैठका झाल्या होत्या. जवळपास सर्व मुद्यांवर सहमती झाली होती. राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अधिका-यांची जुलै महिन्यात अंतिम बैठक झाली. मात्र, आता हा उद्योग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये सुरू होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांता सोबत झालेल्या चर्चेनुसार सेमीकंडक्टरचा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे सुरू होणार होता. या प्रकल्पामुळे ८० हजार ते एक लाख रोजगार निर्माण झाला असता. यातील ३० टक्के रोजगार थेट होता, तर जवळपास ५० टक्के रोजगार अप्रत्यक्ष होता.
वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. अग्रवाल यांनी ट्विट केले की, वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये उभारण्यात येणार आहे. या प्लांटच्या माध्यमातून वेदांत समूह गुजरातमध्ये 1.54 लाख कोटी रुपयांची ऐतिहासिक गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे आत्मनिर्भर सिलिकॉन व्हॅली बनण्याचे भारताचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.
स्वत:साठी खोके, राज्याला धोके
वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये गेला आहे. जे खरे मुख्यमंत्री असतील त्यांनी सांगावे की, हा प्रकल्प शेवटच्या क्षणी महाराष्ट्राच्या हातून का गेला, स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, असे यांचे झाले आहे. अशी टीका माजी मंत्री युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, हा सेमीकंडक्टर प्लांट महाराष्ट्रात आणण्यासाठी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मी अनेक बैठका घेतल्या होत्या. हा प्लांट महाराष्ट्रात उभारण्याचे जवळपास ठरले होते.