(निवोशी/ गुहागर – उदय दणदणे)
गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायतीने विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा सकारात्मक ऐतिहासिक निर्णय २० जून २०२२ रोजी सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामसभेत ठराव करून घेण्यात आला होता.
हा सकारात्मक निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतींना विधवा अनिष्ट प्रथेचे निर्मूलन करण्याचे दिलेल्या आदेशानुसार तसे परिपत्रक काढून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. त्यापार्श्वभुमीवर ग्रामस्थांनी सखोल चर्चा करून राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने कृतीशील कार्यवाही करण्याचे सर्वानुमते ठरविले होते. सदर विधवा अनिष्ट प्रथेचे निर्मूलन करण्याच्या बाबतीत विशेष ग्रामसभेत सकारात्मक निर्णय घेणारी ग्रामपंचायत उमराठ बहुधा गुहागर तालुक्यातील पहिली आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दुसरी ग्रामपंचायत आहे.
ग्रामपंचायत उमराठ कार्यक्षेत्रातील महसुली गाव उमराठ खुर्द आंबेकरवाडीतील सुपुत्र आणि सरपंच जनार्दन आंबेकर यांचे धाकटे काका कै. सोनू बाबू आंबेकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी नुकतेच गुरूवार दि. २१ जून २०२२ रोजी हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने आपल्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते एक अत्यंत शांत स्वभावाचे आणि सार्वजनिक कामांत सदैव पुढाकार घेणारे व्यक्तीमत्वाचे उत्तम आर्टिस्ट होते. त्यांच्या अंगी हस्तकला, पेंटिंग आणि चलचित्रकार अशी उत्कृष्ट कला होती.
ग्रामपंचायत उमराठच्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णया नंतर घडलेली ही प्रथमच घटना असल्यामुळे अर्थातच उमराठ खुर्द आंबेकरवाडीतील भाऊबंदांसमोर तात्विक समस्या उभी राहिली की नेमके करायचे काय ? समस्या हाताळायची कशी ? त्यावेळी सरपंच जनार्दन आंबेकर यांनी धिरोदात्तपणे भाऊबंदांना सांगितले की, आपण विशेष ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयानुसार यावेळी आमच्या कुटूंबापासून वाटचाल करूया.
त्याप्रमाणे काकांच्या अंत्यविधीचे सोपस्कार करतेवेळी आंबेकरवाडीतील भाऊबंद आणि महिला भगिनींनी दिलेल्या मुभेप्रमाणे काकी विजयाबाई आंबेकर यांनी स्वखुशीने सौभाग्यलेण असलेले फक्त मंगळसूत्र काढून काकांच्या चरणी अर्पण केले. मात्र इतर अनिष्ट प्रथा कुंकू पुसणे, बांगड्या वाढवणे, पायातील जोडवी काढणे इत्यादी कोणत्याही प्रथांचे पाळण केलेले नाही. विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याच्या घेतलेल्या या निर्णयाचे श्रीमती विजयाबाई आंबेकर, सरपंच जनार्दन आंबेकर, आंबेकरवाडीतील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत उमराठ या सर्वांचे गुहागर तालुक्याबरोबरच सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.