(विशेष प्रतिनिधी /रत्नागिरी)
तालुक्यातील उक्षी-गणपतीपुळे रोडवर आधीच चढाव आणि त्यात यु आकाराची वेडीवाकडी वळणे यामुळे वाहन चालक जीव मुठीत घेउन या मार्गावरून प्रवास करतात. त्यातच एक मृत्यूचं नवीन संकट संबंधित विभागाने समोर ठेवलं आहे. या चढावामध्ये एक संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. मात्र या संरक्षण भिंतीचे चिरेच निखळल्याने ते कोसळून कोणत्याहीक्षणी जीवितहानी होवू शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे. लाखोंचा खर्च करुन बांधलेली ही संरक्षक भिंत म्हणायची की बागेचा गडगा (बांध)? असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.
उक्षी रोड वरुन गणपतीपुळेला जाण्यासाठी अनेक पर्यटक या मार्गाचा अवलंब करतात. या ठिकाणी बांधण्यात आलेली संरक्षक भिंत ही एक वर्ष भरापूर्वी बांधण्यात आली आहे. जवळपास 10-15 फुट उंच असलेल्या या चिर्याच्या भिंतीला खालपासून वरपर्यंत भेगा गेल्या आहेत. चिरे पूर्णपणे निखळले आहेत. मातीपासून भिंतच बाजूला झाली आहे. एखादा वाहन चालक उक्षीकडून वरच्या दिशेने येत असताना एवढी मोठी संरक्षक भिंत कोसळली तर केवढा मोठा अनर्थ घडेल. त्यातच निमुळता रस्ता आहे. हे चिरे कोसळले तर रस्त्यावरुन खालपर्यंत घरंगळत जावू शकतात. वाहने दरीत कोसळून मोठी हानी होवू शकते. उंच चढाव असल्यामुळे वाहनचालकांना आजूबाजूलाही गाडी घेता येणार नाही. मग दुचाकीस्वारांचं काय? अंगावर असे दगड आलेच तर त्यांनी काय करावं? गाडी थांबवणार की उडी मारणार? शिवाय घालच्या बाजूला जोशी यांचं घर आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून पुढील अनर्थ टाळवा अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल.
संरक्षक भिंत अशी असते का?
एवढया मोठया चढावामध्ये सिमेंट, क्राँकीट, खडीने मजबूत संरक्षक भिंत असणे गरजेचे असताना नुसते चिरे आणि सिमेंट भरून संरक्षक भिंत तयार केली आहे. संरक्षक भिंत कशी असते हे संबंधित विभागाला माहित नाही? की केवळ मलिदा लाटण्यासाठीच संरक्षक भिंतींचा घाट घातला गेला. अशाप्रकारचे हे विकास कामे होत असतील तर जनतेने जाब विचारायला हवा.