( रत्नागिरी /प्रतिनिधी )
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचे सुरक्षा रक्षक शनिवारी रात्री गंभीररित्या जखमी अवस्थेत सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा घातपात असावा असा संशय वर्तविण्यात येत आहे. या सुरक्षा रक्षकाची प्रकृती गंभीर असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आमदार राजन साळवी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला सुमित सावंत हा रत्नागिरी पोलीस दलात आहे. सध्या ते आ. राजन साळवी यांचे बॉडीगार्ड म्हणून तैनात आहेत. शनिवारी रात्री माळनाका ते थिबा पॅलेस दरम्यान जात असताना त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे. श्री. सावंत यांना जबर मारहाण झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे असून रात्रीच्यावेळी हा प्रकार घडल्याने हल्लेखोर नेमके कोण होते याची माहिती सध्या मिळवणे कठीण बनले आहे. आ. राजन साळवी यांचे बॉडीगार्ड सुमित सावंत यांना गंभीर जखमी अवस्थेत शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे येत आहे. जेलनाका ते माळनाका व थिबापॅलेस दरम्यानचे सिसिटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. शनिवारी रात्री माळनाका परिसरात एक अपघात देखील झाला होता. या अपघाताशी निगडित हा हल्ला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.