पालखी सोहळा
भक्त मंडळाची
विठू दर्शनाची
आस लागली … १
टाळ मृदूंग
नादही घुमला
भक्तीत दंगला
विठूचा रंग … २
हा वारकरी
भोई पालखीचा
मोद हा मनीचा
आनंद सरी … ३
नाम मुखात
भजन किर्तन
चालले नर्तन
भक्ती तालात … ४
विठू चरणी
भक्त लोटांगण
ठेंगणे अंगण
होई करणी … ५
भक्तीत मन
या वारकर्याचे
त्या विठूरायाचे
रंगते मन … ६
विठू नामाचा
गजर चालला
भक्तीत रंगला
भक्त रायाचा … ७
सुंदर कसा
पालखी सोहळा
अंतरगी कळा
भक्त हा असा … ८
सौ. मनिषा पटवर्धन
आला आषाढाचा मास
वेध लागले वारीचे
सुख डोकावे मनात
विठू माऊली भेटीचे
पायी निघतो वारीला
कारभारीण संगती
मुखी नाम विठ्ठलाचे
वाट पाऊले चालती
दिंड्या पताकांच्या संगे
घुमे टाळ नि मृदुंग
डोळा दिसते पंढरी
मन कीर्तनात दंग
वाहे वारा पडे पाणी
कोण आम्हा अडवेल
नाही थकवा जीवाला
पांडुरंग सांभाळेल
गावोगावीच्या पालख्या
भेटीसाठी या चालल्या
विठ्ठलाच्या चरणाशी
येऊनिया विसावल्या
फुले वाळवंट सारे
चंद्रभागा हरखली
मुले माणसे सगळी
दर्शनासी आतुरली
दाटीवाटी सारीकडे
फुले वैष्णवांचा मेळा
फिटे डोळ्यांचे पारणे
विठू दिसता सावळा
डोळे भरती पाण्याने
माय लेक दुरावती
पुन्हा येईन फिरूनी
भक्त विठूला सांगती
विठू उभा विटेवरी
पाहे लेकरांची वाट
भक्त वारीचा घालती
पुन्हा कार्तिकीला घाट
© उमा जोशी
या कवितेतील पहिली दोन कडवी रुक्मिणी अगदी वैतागून अथवा हैराण होऊन बोलते आहे असे वाचावे नंतर रुक्मिणी हळवी होऊन बोलते
वाऱ्यावर्ती पसरून गंध वाहत आले जेंव्हा चंदन
रुक्मिणी वदली विठुरायाला चला उठा व्हा तयार पटकन!!
भरजरी शेला , दाग दागिने सोनेरी तव मुकुट काढला !
फुले सुगंधी घालून मी तुळशीहार आहे बनवला
विठू हसला हळूच गाली म्हणे राणी का ग चिडशी
नको बोलू मला सारखे त्यात आज तर
एकादशी !
झाले काय सांग ना मला तयार हो तूही छानशी
नेस आज ती हिरवी साडी मउमखमली गर्भरेशमी !!
लक्ष्मीहार तनमणी तोडे घालून तुही नटून घे
उगाच का ग सखे मजला सारखे सारखे भरतेस रागे !!
मी बघ झालो सज्ज आता जातो तुझ्या आधी पुढे
थांबले असतील वारकरी जे भरपूर अंतर चालून आले !!
नको प्रतीक्षा आता क्षणाची नकोच आता उशीर
नाव घेत ते चालत आले मला भेटण्या अधीर !!
केळी रताळी आणून ठेव आणि फराळ सुद्धा ठेव करून
भुकेले असतील सारे जेवतील ग पोट भरून !!
रुक्मिणी राहिली बघतच विठूला स्वतः चे डोळे भरून
अहो यंदाही नाही कोणी वारकरी आला कोरोना म्हणून !!
सुनी राहिली पंढरी आपली सुनीच चंद्रभागा
आज वाढवा तुम्हीच त्यांच्या आयुष्याचा धागा !!
इथेच राहावे सजून उभे पाहतील सारे घरून
आशीर्वाद तुम्ही द्यावे त्यांना उत्तम आरोग्य भरून !!
रागावू नका नाथ तुम्ही मी मुद्दाम केली तयारी
तुम्हा पाहता दिसेल त्यांना डोळ्यांपुढे पंढरी !
विठुही वदला गहिवरून मग खरेच आहे तुझे
मी आहेच सोबत त्यांच्या जे निस्सीम भक्त माझे !!
माझ्या पायी ज्यांना दिसते विश्वेश्वर काशी
घाबरू नये त्यानी कधी आहे मी पाठीशी !!
ऋतुजा कुळकर्णी, रत्नागिरी