( नवी दिल्ली )
चीनमध्ये येत्या २३ सप्टेंबरपासून रंगणाऱ्या बहुप्रतिक्षित एशियन गेम्ससाठी क्रिडा मंत्रालयाने ६३४ भारतीय खेळाडूंच्या नावांना मंजुरी दिली. हे सर्व खेळाडू विविध क्रीडा प्रकारात सहभागी होतील. यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू 38 स्पर्धांमध्ये आव्हान देतील. आशियाई क्रीडा स्पर्धा २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहेत.
२०१८ मध्ये जकार्ता इथे एशियन गेम्सचे आयोजन केले गेले होते. त्यावेळी भारताच्या ५७२ खेळाडूंची निवड करण्यात आली होती.यंदाच्या एशियन गेममध्ये ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत भारतातील एकूण ६५ खेळाडू सहभागी होणार आहेत. ज्यात ३४ पुरूष आणि ३१ महिलांचा समावेश आहे. फुटबॉल संघात एकूण ४४ खेळाडूंना (पुरूष संघात २२ आणि महिला संघात २२) स्थान मिळाले आहे. यानंतर पुरुष आणि महिला हॉकी संघात प्रत्येकी १८-१८ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेटच्या पुरूष आणि महिला संघात प्रत्येकी १५-१५ खेळाडूंचा समावेश करण्यात आला. शूटिंगमध्ये ३० आणि रोइंगमध्ये ३३ खेळाडूंना मान्यता देण्यात आली. तसेच क्रिडा मंत्रालयाने वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल आणि रग्बीमध्ये कोणत्याही पुरुष खेळाडूला स्थान दिलेले नाही. मार्शल आर्ट्स आणि वेटलिफ्टिंगमध्ये दोन महिला खेळाडूंना संधी देण्यात आली. तर, यादीत फक्त एका जिम्नॅस्टचा समावेश आहे.