(रत्नागिरी)
दिव्यांगांच्या मदतीसाठी रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन (आरएचपी फाउंडेशन) विविध कार्यक्रम, उपक्रम राबवीत असते. जिल्ह्यात अजूनही अनेक दिव्यांगांना सहकार्याची आवश्यकता आहे. जसजशी माहिती मिळते त्याप्रमाणे फाउंडेशन समाजातील देणगीदारांच्या मदतीने, प्रसंगी पदरच्या निधीतून योगदान देत असते. अशाच प्रकारची एक मदत बुरोंडी (ता. दापोली) येथील दिव्यांग व्यक्तीला करण्यात आली.
आरएचपी फाउंडेशनने लाईक ईब्राहीम बुरोंडकर (रा. मु. पो. बुरोंडी, ता. दापोली) यांना व्हीलचेअरची मदत उपलब्ध करून दिला. बुरोंडकर यांना वयाच्या चौथ्या वर्षी भरपूर ताप आला होता. त्यानंतर त्यांच्या उजव्या पायाला पोलिओ झाला. त्यामुळे ते गुडघ्यावर हात ठेवून चालायचे. ते दिव्यांग असूनही चांगल्या प्रकारे आयुष्य जगत होते. ते स्वतः दिव्यांग असले तरीही तालुक्यातील इतर दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र काढण्याचा अर्ज भरुन द्यायचे. त्यांच्यासोबत रत्नागिरीत जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये यायचे. तिथे हे प्रमाणपत्र काढून देण्यास मदत करत होते. त्यांची पत्नी सुरैय्या बुरोंडकर या मिळेल ते घरकाम करून संसाराला हातभार लावतात. त्यांना दोन मुलं आहेत. मोठी मुलगी सबा इयत्ता बारावीत शिकत असून मुलगा मुद्दशीर इयत्ता आठवीत शिकतो.
पाच वर्षापुर्वी बुरोंडकर यांना मधुमेहाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांच्या डाव्या पायाला जखम झाली, शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु जखम लवकर बरी न झाल्याने गॅंगरीन होऊन पुन्हा खासगी रुग्णालयात फेब्रुवारी २०२१ मध्ये डावा पाय गुडघ्याच्या वरपासून काढावा लागला. त्यासाठी जवळपास ८० हजार रुपये खर्च झाला. नातेवाईक, मित्रपरिवाराकडून आणि रमजान ईदमध्ये मिळणारी मदत यातून त्यांनी खर्च भागवला. परंतु हजारो रुपयांचे कर्जही काढावे लागले. या कर्जाचा डोंगर हळुहळू कमी करत ते आयुष्य जगत आहेत. डावा पाय काढल्यामुळे त्यांचे चालणे पूर्णपणे बंद झाले. घरामध्येच बिछान्यावर आयुष्य घालवायची वेळ आली. त्याचवेळी आरएचपी फाउंडेशन संस्थेला ही माहिती मिळाली. फाउंडेशनने त्यांचे दुःख जाणून घेतले. आसपास लोकांकडून माहिती मिळवली आणि बुरोंडकर यांना व्हीलचेअर देण्याचे ठरवले.
बुरोंडकर यांना व्हीलचेअर स्वरूपात मदत मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण आता व्हीलचेअरवरुन बाहेर फिरता येऊ लागल्याने त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी आली. त्यामुळे ते पुढील आयुष्य खूप आनंदाने समाधानाने व्यतीत करु शकतात. संपूर्ण कुटुंबसुद्धा आनंदी झाले आहे.