(रत्नागिरी)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा मधील गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या तसेच विद्यार्थी व शिक्षकांच्या न्याय संगत मागण्या शासन स्तरावर प्रदीर्घकाळ प्रलंबित आहेत सदर मागण्या समजून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी शासन पातळीवर कोणतीच अपेक्षित कार्यवाही होत नाही. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत धरणे आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
शासनाकडून येणारे भाराभर विविध उपक्रम राबवणे, त्यांच्या नोंदी ठेवणे, लिंक भरणे, त्याचप्रमाणे विविध प्रकारची माहिती देणे यामुळे अध्ययन अध्यापनाचा बराचसा वेळ वाया जात आहे. “आम्हाला शिकवू द्या हो” अशी शासनाकडे मागणी करण्याची वेळ आली आहे. या भरमसाठ उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अडसर निर्माण होत आहे. त्यामुळे सदर प्रश्न अधिक गंभीर होताना दिसत आहेत. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य शाखेने सोमवार दिनांक ८ऑगस्ट २०२२ रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्याबाबत निर्णय घेऊन तशी नोटीस शासनाला दिली आहे.
जिल्हा शाखेच्या नियोजनानुसार मंडणगड, दापोली, खेड या तीन तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी कार्यालय दापोली येथे होणारे आंदोलन जिल्हा कार्याध्यक्ष श्री.अजित भोसले, जिल्हा उपाध्यक्ष श्री. दिनेश झोरे, श्री.विनायक वाळंज, जिल्हा सल्लागार श्री.परशुराम पेवेकर, जिल्हा संघटक श्री.संजय गडाळे, श्री. देविदास ठोंबरे, श्री.मंगेश कडवईकर, जिल्हा महिला प्रतिनिधी सौ. मनाली कासारे यांच्या मार्गदर्शनानुसार खेड तालुका अध्यक्ष श्री.शरद भोसले, सचिव श्री.अशोक आकुसकर, मंडणगड तालुका अध्यक्ष श्री.वैभव भोसले सचिव श्री.उमेश सापटे, दापोली तालुकाध्यक्ष श्री.जावेद शेख सचिव श्री.दिनेश चव्हाण यांचेसह तालुका पदाधिकारी व सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित राहणार आहेत.
तरी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात येत आहे.