(कोल्हापूर)
राज्यातील बहुचर्चित सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असतानाच निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात राजकीय वादंग पेटलेलं आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तीन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत.
नागपूर आणि पुण्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित शहा रविवारी कोल्हापुरात आले होते. यावेळी अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यातून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या सभेला गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांची उपस्थिती होती.
कोल्हापुरातील भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, आगामी लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा एकत्र लढणार आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीसह उरले सुरलेले सर्व पक्ष आमच्याविरोधात रिंगणात असणार आहेत. परंतु आगामी लोकसभा निवडणूक ही फक्त नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी नाही तर भारताला महान आणि समृद्ध करण्यासाठी महत्त्वाची असणार असल्याचं गृहमंत्री अमित शहा म्हणाले.
The upcoming general election isn’t just an election to re-elect Modi ji as PM, but it is going to be an election for making a great and prosperous India.
– Shri @AmitShah pic.twitter.com/MNRxmwJZOe
— BJP (@BJP4India) February 19, 2023
ज्या-ज्या वेळी मी कोल्हापुरात येऊन श्री करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं आहे, त्यावेळी भाजपाचा विजय झालेला आहे. यावेळीही मी आवर्जून अंबाबाईचं दर्शन घेतलं असून त्यामुळं आता २०२४ मध्ये भाजपाचा विजय नक्की होणार असल्याचं अमित शहा म्हणाले. एखाद्या ठिकाणी एकदा का भाजपाचा विजय झाला तर तिथं पुन्हा भाजपच निवडून येते. त्यामुळं मला आगामी निवडणुकांची चिंता नसल्याचंही अमित शहांनी स्पष्ट केलं आहे.
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजप-शिवसेनेची युती होती, त्यावेळी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवली. परंतु निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी वडिलांच्या विचारसरणीला मूठमाती देत विरोधी पक्षांसोबत घरोबा केला. त्यामुळंच आज खरी शिवसेना आमच्यासोबत आली असल्याचं सांगत आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती कायम राहणार असल्याचं गृहमंत्री अमित शहांनी स्पष्ट केलं आहे.
काँग्रेसवरही टीका
अमित शहा यांनी यावेळी काँग्रेसवर निशाणा साधला. ‘काँग्रेसमध्ये दहशतवादाविरोधात लढण्याची हिंमत नव्हती. काँग्रेस सरकारमध्ये पंतप्रधानांना कोणीही विचारत नव्हते. सगळेच मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होते. त्यांच्या काळात अराजकता माजलेली होती. देशाची आर्थिक सुव्यवस्था, काश्मीरमधील प्रश्न गंभीर होते’, अशी टीका अमित शहांनी केली.