(पालघर)
दुर्गम भागात पाण्यासाठी पायपीट करावी लागते. उन्हाळ्यात परिस्थिती आणखी विदारक होते. पाण्यासाठी होणाऱ्या त्रासाने सर्वाधिक हाल महिलांचे होत असतात. पाण्यासाठी आईची होणारी वणवण बघवत नसल्याने पालघर मधील केळवे धावंगेपाडा येथील एका 14 वर्षाच्या मुलाने घराच्या आवारात विहीर खोदली आहे.
पालघर मधील केळवे येथे दर्शना आणि रमेश हे दोन्ही पती-पत्नी बागायतदार वाडीत मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मोलमजुरी करून संध्याकाळी घरी परतल्यावर दर्शना यांना आपल्या कुटुंबासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. मात्र आईची ही पाण्यासाठी रोजची होणारी धावपळ मुलगा प्रणय याला पहावली नाही. शेवटी आठवीत शिकणाऱ्या अवघ्या 14 वर्षाच्या प्रणयने आपल्या घराच्या आवारातच विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. प्रणयने घराच्या आवारातच विहिरीचं खोदकाम करण्यास सुरुवात केली. घरातील शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांचा वापर त्यासाठी केला. प्रणयने चार दिवसात 18 फुटांपेक्षाही जास्त खोल विहीर खोदली. अखेर या विहिरीला 18 फूटानंतर पिण्या योग्य पाणी लागलं आणि प्रणयच्या प्रयत्नांना यश मिळाले.
प्रणयने केलेली जिद्द, हिम्मत आणि मेहनत यांच्या जोरावर आपल्या आईचा पाण्यासाठी होणारा त्रास कमी केला. या सगळ्यामुळे चिमुकल्या प्रणयवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. प्रणयने केलेल्या या कामाचे त्याच्या आई-वडिलांना कौतुक आहे. पाण्यासाठी होणारी पायपीट आपली कमी झाल्याने प्रणयची आई दर्शना यांनी देखील समाधान व्यक्त केल आहे.