(मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सल्ल्यानुसार लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरवणार आहेत, अशी शक्यता होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात काही आमदारांची नाराजी ओढवण्याची शक्यता लक्षात घेऊन विस्ताराची तारीख निश्चित होऊ शकली नाही व त्यावर निर्णयही झाला नसल्याचे समजते. सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २० मंत्री आहेत.
सध्या एका मंत्र्यांकडे अनेक खात्यांचा कार्यभार असल्याने मंत्रिमंडळ विस्तार करून राज्यमंत्र्यांची नियुक्ती करणे आवश्यक झाले आहे. राज्यमंत्र्यांच्या नियुक्तीमुळे मंत्र्यावरील कामाचा ताण थोडा कमी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीदरम्यान केले होते. मात्र, आता एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्यावर मौन पाळत आहेत. कोणतीच स्पष्ट भूमिका घेताना ते दिसत नाहीत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या ४० आमदारांपैकी बहुतांश आमदारांना मंत्री व्हायचे आहे. दुसरीकडे बच्चू कडू यांच्यासारख्या अपक्ष आमदारांनाही मंत्री व्हायचे आहे. भाजपचे अनेक ज्येष्ठ आमदारही मंत्री होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची दिल्लीत भेट घेतली. ही बैठक संपल्यानंतर दोन्ही नेत्यांनी शाह यांच्यासोबत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुद्यावर सुमारे ३० मिनिटे चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत १९ डिसेंबरपासून सुरू होणा-या नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारावर एकमत होऊ शकले नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे होऊ घातलेला मंत्रिमंडळ विस्तार आता जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.