(तरवळ/अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटी मार्फत बळीराम परकर विद्यालय व तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय जाकादेवीमध्ये शिक्षण घेतलेल्या ज्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केली अशा २१ माजी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजच्या कै. सदानंद बळीराम परकर सभागृहात संस्थेचे अध्यक्ष श्री सुनिल उर्फ बंधु मयेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली. संपूर्ण भारतात हे अमृत महोत्सवी वर्ष अनेक उपक्रमांनी साजरे करण्यात येत आहे, मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्यावतीने सुद्धा या नाविन्यपूर्ण विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन२१ माजी विद्यार्थी या सत्कार समारंभाला उपस्थित राहिले. काही प्रकृती ठीक नसल्यामुळे येऊ शकले नाहीत, इतक्या वर्षांनी शाळेने आपली आठवण करून आपला भव्य सत्कार केला हा क्षण आम्ही शब्दांत वर्णन करू शकत नाही, पुन्हा एकदा आम्ही आमच्या शाळेत आलो ते दिवस त्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत, कदाचित जिल्ह्यातील अशी पहिलीच शिक्षण संस्था असेल जिने इतक्या वर्षांनीही आस्थेने आमची दखल घेतली. आम्ही या संस्थेमुळे घडलो, असे गौरवोद्गार सत्काराला प्रतिसाद देताना सत्कार मूर्तींनी काढले व आपल्या भावना व्यक्त केल्या. सत्कारमुर्तींमधून श्री बापट, श्री लाकडे, श्री आंबेकर, श्री केळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण योजना व उपक्रम राबविण्यात येतात, या विशेष नवोपक्रमाचे कौतुक परिसरातून करण्यात येत आहे. सत्कारमूर्तीकडुन कृतज्ञता आणि आभार व्यक्त करण्यात आले, या कार्यक्रमाला मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री सुनिल उर्फ बंधु मयेकर, सचिव श्री विनायक राऊत, संचालक श्री किशोर पाटील, संचालक व पंचायत समितीचे सदस्य श्री गजानन उर्फ आबा पाटील, पंचायत समितीचे श्री नावडे, श्री विवेक परकर, श्री आंबेकर, श्री श्रीकांत मेहंदळे, श्री नंदकुमार यादव, श्री रोहित मयेकर, श्री विलास राणे,श्री दिवाकर पवार, श्री दिवाकर सुर्वे, जाकादेवी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बिपिन परकर, मालगुंड प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नामदेव वाघमारे, पर्यवेक्षक श्री नितिन मोरे तसेच सत्कारमूर्तींचे नातेवाईक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मिलिंद सुर्वे यांनी केले. तर संचालक श्री विवेक परकर यांनी विद्यार्थ्यांना अल्पोपहार दिला.