(नाशिक / प्रतिनिधी)
‘अध्यात्मातून राष्ट्रविकास’ हे सेवामार्गाचे ब्रीद आहे.तर ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान ’ हा सेवामार्गाचा नारा आहे. हीच भूमिका स्वीकारुन सेवेकर्यांनी कुटुंब, गांव, देश अन् संस्कृती संपन्न करण्यासाठी ग्राम अभियानातून सेवाकार्य करावे असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी केले.
दिंडोरी प्रधान केंद्रात रविवार दि.9 जुलै रोजी साप्ताहिक प्रश्नात्तरे-मार्गदर्शन आणि सत्संग समारोह झाला. यावेळी राज्यभरातून आलेल्या सेवेकर्यांशी गुरुमाऊलींनी संवाद साधला. गुरुमाऊली श्री मोरे म्हणाले की, सेवामार्गाने मानव हित, राष्ट्रहित आणि विश्वशांतीलाच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या राष्ट्राचे रक्षण करणार्या जवानांना बळ मिळून त्यांचे संरक्षण व्हावे, शेतकरी सुखी होऊन शेतकर्यांच्या आत्महत्या टळाव्यात आणि अंधश्रद्धा दूर होऊन सर्वसामान्यांनी विज्ञानाची कास धरावी याकरिता सेवामार्गातर्फे बहुविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून अब्जचंडीची सेवा केली जात आहे.
दुर्गासप्तशतीचे 9 पाठ केल्यास नवचंडी, 100 पाठ केल्यास शतचंडी, 1 हजार पाठ केल्यास सहस्त्रचंडी, दहा हजार पाठ केल्यास आयुत चंडी, एक लाख पाठ केल्यास लक्ष चंडी आणि एक कोटी पाठ केल्यास कोटीचंडी होते, ही संपूर्ण सेवा राष्ट्र हितासाठीच सेवामार्गातर्फे करण्यात आली होती. त्याच उद्देशाने श्री दुर्गा सप्तशती, श्री स्वामी चरित्र आणि रुद्रसूक्त यांचे प्रत्येकी 100 कोटी पाठ करण्याचा संकल्प सोडण्यात आला असून आजपावेतो प्रत्येकी 85 कोटी पाठ झालेले आहेत अशी माहिती गुरुमाऊलींनी दिली. देशाचे भले होण्यासाठी सर्व सेवेकर्यांनी ही अब्जचंडीची सेवा अवश्य केली पाहिजे. आषाढ नवरात्रात ही सेवा मोठ्या प्रमाणावर करावी, ग्राम अभियानात सहभागी होऊन रोज एक सेवेकरी घडवून दुसर्याचे दु:ख, अश्रू पुसण्यासाठी सेवाकार्य करा असा उपदेश त्यांनी केला.
आदर्श पिढी घडविण्यासाठी मूल्यसंस्कार विभागाने, दु:खी व्यक्तीला सुखी करण्यासाठी प्रश्नोत्तरे विभागाने, सर्वांचे आरोग्य निरामय राहण्यासाठी आयुर्वेद विभागाने, विवाह समस्येवर मार्गदर्शन करण्यासाठी विवाह मंडळांनी, वास्तूचे वास्तूपण टिकविण्यासाठी वास्तूशास्त्र विभागाने, कायदेविषयक सहकार्य व सल्ला देण्यासाठी कायदे विषयक सल्लागार विभागाने, शेतकर्यांना संपन्न करण्यासाठी आणि सर्वांना विषमुक्त अन्न मिळण्यासाठी कृषी विभागाने तसेच कुलधर्म-कुलाचाराची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठी अस्मिता-भारतीय संस्कृती विभागाने झोकून देऊन सेवाकार्य करावे अशी आज्ञा गुरुमाऊलींनी केली.
श्रावणात भागवत सप्ताह
पूर्वजन्मदोष, भोग, प्रारब्ध, क्रियमाण, शाप, ताप, तळतळाट, दोष, पीडा, बाधा, यावर भागवत सेवा प्रभावी असून आगामी श्रावण महिन्यात भागवत सप्ताह घेण्याचे नियोजन केले जात आहे.