( बंगळूर )
येथील पुत्तेनहळीमध्ये स्थित सत्य साई गणपती मंदिरात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नोटांमध्ये सजवले गेले आहे. मागील तब्बल तीन महिन्यांपासून या मंदिरात सजावटीची तयारी सुरू होती. ती आता पूर्णत्वास आली आहे. पूर्ण मंदिराचा परिसर नोटांनी सजवण्यासाठी 2 कोटी रुपयांच्या नोटा व 50 लाख रुपयांची नाणी वापरली गेली असल्याचे व्यवस्थापनाने यावेळी सांगितले.
दरवर्षी या मंदिरात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने वैविध्यपूर्ण आरास केली जाते. यंदाही तीच परंपरा कायम राखताना व्यवस्थापनाने नोटा व नाण्यांचा खुबीने वापर करत मंदिराला आकर्षक स्वरूपात सजवले आहे. मंदिराच्या सजावटीसाठी 10, 20, 50, 100, 200 व 500 रुपयांच्या नोटांचा वापर केला गेला आहे. शिवाय, 50 लाख रुपयांची नाणीही या सजावटीत समाविष्ट आहेत.
जवळपास अडीच कोटी रुपये सजावटीतच असल्याने या पार्श्वभूमीवर मंदिरात कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. शिवाय, परिसरात 22 सीसीटीव्ही कॅमेरे तैनात आहेत. व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, ही पूर्ण सजावट प्रत्यक्षात साकारण्यासाठी 150 स्वयंसेवक व कर्मचारी तब्बल तीन महिने यासाठी अविरत झटत होते.