(रत्नागिरी)
महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीच्या छात्रांचा दि.१५ ते २४ नोव्हेंबर दरम्यान कोकण सारथी मेनुशिबीर आयोजित करण्यात आले आहे. रत्नागिरीतील दाभोळ दरम्यान सागरी मार्गाने चित्तथरारक अनुभव घेत हे छात्रसैनिक ३३२ किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. या मोहिमेत प्लॅस्टीकमुक्त समुद्राबाबत जनजागृती केली जाणार आहे.
एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर के. राजेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत एनसीसी छात्रसैनिकांच्या या सागरी शिबीराविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, सुरुवातीला प्राथमिक शिबीरातील ११० छात्रांपैकी ६० छात्रांची निवड मेनूशिबीरासाठी केली जाणार आहे. या शिबीराला आम्ही कोकण सारथी असे नाव दिले आहे.
६० छात्रांमध्ये ३५ मुले आणि २५ मुलींचा समावेश असेल. १५ नोव्हेंबरला रत्नागिरी ते वरवडे, १६ नोव्हेंबरला वरवडे ते जयगड, १७ नोव्हेंबरला जयगड ते तवसाळ आणि तिथून पुन्हा मागे. १८ नोव्हेंबरला जयगड ते बोऱ्या आणि तिथून पुन्हा मागे. १९ नोव्हेंबरला जयगड ते दाभोळ, २० नोव्हेंबरला दाभोळ ते धोपावे आणि तिथून पुन्हा परत. २१ नोव्हेंबरला दाभोळ ते अंजनवेल- वेलदूर आणि तेथून पुन्हा परत. २२ नोव्हेंबरला दाभोळ ते जयगड. २३ नोव्हेंबरला जयगड ते काळबादेवी आणि २४ नोव्हेंबरला काळबादेवी ते रत्नागिरी असा प्रवास छात्रसैनिक करणार आहेत. समुद्रमार्गे हा ३३२ किमीचा प्रवास असणार आहे.
ज्या ठिकाणी मुक्काम असणार आहे त्या परिसरात छात्रसैनिक प्लॅस्टीकमुक्त समुद्र या विषयावर जनजागृती करणार आहेत. त्यामध्ये पथनाट्य, नाट्यछटांचा समावेश असणार आहे. सध्या छात्रसैनिक भाट्ये येथील शिबीरात जोरदार सराव करत आहेत. समुद्रातील वातावरण, समुद्रातून बोटीचा प्रवास या विषयीची माहिती छात्रसैनिकांना मिळत आहे. कोकण सारथी शिबीरात ६० विद्यार्थ्यांसह कमांडिंग ऑफिसर, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक एनसीसी ऑफिसर, ३ नौका, १ सुरक्षेसाठी नौका आणि १ आपत्कालीन नौका असा लवाजमा असणार आहे.