(संगमेश्वर / प्रतिनिधी)
काळाच्या ओघात कुटुंबे विस्तारत गेली तशीच ती विभक्तीही होत गेली. विभक्त कुटुंबाची वेगवेगळी घरे झाली आणि प्रत्येक सणवार त्या सगळ्या घरांमध्ये साजरा होत गेला. या सगळ्याला छेद देणारे कुटुंब म्हणजे संगमेश्वर येथील शेट्ये कुटुंब, येथे २५ घरांचा एकत्रित गणेशोत्सव या कुटुंबात साजरा होतो.
शेटये कुटुंबाचे संगमेश्वर येथील रामपेठेत मूळ घर आहे. या कुटुंबीयांचे पूर्वज बाळकृष्ण आणि मुरारी शेटये हे व्यवसायानिमित्त प्रथम संगमेश्वर सोडून बाहेर पडले. कालांतराने हे कुटुंब विस्तारत गेले. कुटुंब जसे विस्तारत गेले तसे त्याची शहरातून आणि ठिकठिकाणी अनेक घरे झाली. पण असे असले तरी ह्या कोणत्याही घरात अथवा पिढीत स्वतंत्र गणपती स्थापन करण्याची परंपरा नाही.
गणेशोत्सवाच्यानिमित्त शेट्ये कुटुंबीय रामपेठेतल्या मूळ घरी एकत्र येतात. गणपतीप्रमाणेच गौरीचीही आरास करून तिची स्थापना केली जाते. शेट्ये कुटुंबात आजही झिम्मा, फुगडी अशा पारंपरिक खेळांचेच आयोजन करून रात्र जागविली जाते. गौरीची आरती मध्यरात्री १२ वाजता केली जाते.
गौरीची एक आख्यायिका कुटुंबात सांगितली जाते. विसर्जनाच्या दिवशी गौरीच्या मुखवट्याचे डोळे पाणावतात आणि त्याच वेळी गौरीचे हात कुंकवाच्या करंड्यात उतरतात, अशी आख्यायिका आहे. गौरी विसर्जनाच्या आदल्या रात्री गौरीसमोर ठेवलेल्या पेल्यातील तांदळात आपोआप मूठभर वाढ होते असे शेट्ये कुटुंबीय सांगतात.