(मुंबई)
आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या सूरज चव्हाण यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कोरोना काळातील खिचडी घोटाळाप्रकरणी ईडी कोठडीत असलेल्या सूरज चव्हाण यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने सूरज चव्हाण यांना गुरुवारी मुंबई सत्रन्यायालयातील कोर्टात हजर केले. त्यानंतर न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांनी चव्हाणांना ७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
सूरज चव्हाण यांना जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांनी गुरुवारी सूरज चव्हाण यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. कोरोनाकाळातील खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण आरोपी आहेत. आता पुन्हा एकदा सूरज चव्हाण यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण 52 कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. या कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचे नाव यामध्ये घेण्यात आलं होतं.
ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून काही सब टेंडर देण्यात आले, ज्यामध्ये वैद्यकीय साहित्य आणि सेवा पुरवण्याचे सब टेंडर होते. असं टेंडरशी संबंध सुरज चव्हाण यांचा येतो, त्यामुळे या संपूर्ण कंत्राटामध्ये आर्थिक व्यवहार होताना नियमांचं उल्लंघन झालं का? यामध्ये कुठल्या प्रकारचा गैरव्यवहार करण्यात आला का? या सगळ्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.