(रत्नागिरी)
सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरण बदलत आहे. परिणामी जिल्ह्यात सर्दी, तापाची साथ डोकं वर काढत आहे, त्यामुळे रुग्णांनी वेळेत उपचार घेवून योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी केले आहे.
सध्या कोरोनाचे रुग्णही वाढत असून, कोणत्याही प्रकारे साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. या चौथ्या लाटेत कोरोना झाल्यानंतर सौम्य लक्षणे असल्याने त्रास कमी होतो. औषधोपचारानंतर लगेच रुग्ण बरा होतो, असेही त्यांनी सांगितले.
लहान मुलांमध्ये सर्दी, ताप, खोकला यासारखे आजारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. घरी राहून कोणतेही आजाराकडे दुर्लक्ष करू नका, वेळेत आपल्या नजीकच्या डॉक्टरांकडे उपचार घ्यावेत. साथीचे आजार असतील तर घाबरुन जाण्याचे कारण नाही, मात्र हे आजार लवकर बरे होत नसतील तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अधिक उपचार घ्यावेत, असेही डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले.
साथीचा ताप हा ३ ते ५ दिवस कमी होत नाही, त्यामुळे घाबरु न जाता वेळेत औषधोपचार घ्यावे शिवाय गरम पाणी, वाफ घेणे, असे घरगुती उपाय करण्यास सूचवण्यात आले आहेत.