(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात नुकतेच महिला विकास कक्ष विभागाचे उदघाटन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी महिला विकास कक्ष विभागाची विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून द्वितीय वर्ष विज्ञान शाखेची कृपा चंद्रशेखर केळकर हिची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग उपस्थित होते. डाॅ. गर्ग व त्याचे सहकारी नितीन पुरळकर व सूरज सुर्वे यांनी महिलांविषयी कायदे व सायबर सुरक्षेविषयी विषयावर मार्गदर्शन केले. डाॅ.गर्ग यांनी आपल्या मार्गदर्शनात आज आपण डिजिटल युगात वावरत असताना सायबर सुरक्षेविषयी जागृत राहणे गरजेचे आहे. आपल्या जीवनातील भरपूर गोष्टी या मोबाईल, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सॉफ्टवेअर यांवर अवलंबून आहेत. आपल्या गोपनीय माहितीचे संरक्षण करण्यासाठी सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे. सायबर सुरक्षेसाठी कठीण पासवर्डचा, अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आदींचा वापर करावा असे आवाहनही डाॅ.गर्ग यांनी केले.
हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१, बालविवाह प्रतिबंधक कायदा आदी महिलांविषयी असलेल्या कायद्याची माहितीही डाॅ.मोहितकुमार गर्ग यांचे सहकारी नितीन पुरळकर व सूरज सुर्वे यांनी दिली.
कार्यक्रमाला संस्थेचे उपकार्याध्यक्ष डाॅ.श्रीराम भावे , कार्यवाह सुनील वणजू , विश्वस्त डॉ. चंद्रशेखर केळकर, कार्यकारणी सदस्य विनायक हातखंबकर, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील ,उपप्राचार्या सौ.वसुंधरा जाधव, महिला विकास कक्ष विभाग प्रमुख सोनाली जोशी, इतर प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अनन्या धुंदूर यांनी केले तर विनय कलमकर यांनी आभार मानले.