(मुंबई)
भिवंडी शहरातून एका सहा महिन्याच्या मुलाचे अपहरण करून त्याची झारखंड नक्षली भागात दोन लाख रुपयांत विक्री करणाऱ्या तिघांना शांतीनगर पोलिसांनी भिवंडीसह झारखंड येथून अटक केली. अपहरण झालेल्या बालकास पुन्हा आईच्या कुशीत सोपवण्यात यश मिळवले आहे.
शांतीनगर न्यू आझाद नगर येथील झोपडपट्टीत राहणारी महिला शहाना अन्सारी हिने 14 एप्रिल रोजी आपल्या सहा महिन्याच्या अरबाज यांस शेजारी राहणारी मैत्रीण फातिमा हिच्या घरी झोपवून रमजानच्या खरेदीसाठी सकाळी गेली होती. दुपारी खरेदी करून मैत्रिणीच्या घरी पोहचल्यावर अरबाज तेथे नसल्या बाबत समजल्यावर शहाना अन्सारी हिच्या पायाखालची वाळू सरकली. परिसरात शोध घेवून ही न सापडल्याने शांतीनगर पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची तक्रार वडील शाहबाज मोहमद अन्सारी यांनी दिली होती.
घटनेचे गांभीर्य पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक बनवून शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस पथकाने परिसरातील काही व्यक्तींकडून माहिती घेत सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे प्रथम भिवंडी शहरात फुटपाथवर कपडे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अफरोज अबुबकर शेख (वय 26 रा. शांतीनगर) यास ताब्यात घेत कसून तपास केला असता त्याने अपहरणाची कबुली देत बाळाला शंभू सोनाराम साव (वय 50 वर्षे रा. येवईनाका ता. भिवंडी) या मार्फत विक्री करण्यासाठी दिल्याचे सांगितले. त्याच्या मोबाईलचा तांत्रिक तपास करीत झारखंड येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शंभू सोनाराम साव यास कल्याण रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडे गुन्ह्याचा सखोल तपास सुरू केला असता अपहरण केलेल्या मुलास झारखंड राज्यातील ओळखीची महिला मंजुदेवी महेश साव ( 34 वर्षे रा. जितकुंडी) भागात महिलेस दोन लाख रुपयांना बाळ विक्री केल्याची कबुली दिली. या महिलेचे वास्तव्य ठिकाण हे रांची पासून 200 दोनशे किमी अंतरावर नक्षलग्रस्त क्षेत्र असल्याने स्थानिक सशस्त्र पोलिसांच्या मदतीने या गुन्ह्यातील बाळाला विकत घेणारी महिला आरोपी मंजुदेवी महेश साव हिस बाळासह ताब्यात घेतले. त्यानंतर सहा महिन्याच्या चिमुरड्या अरबाज यास आई शहाना अन्सारी हिच्या कुशीत सोपविले.