(गणपतीपुळे / वैभव पवार)
राज्य सहकारी बँक व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शिखर संशोधन व प्रशिक्षण संस्था वाशी, नवी मुंबई यांच्या विशेष सहकार्याने रत्नागिरी तालुक्यामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या निवडणूकीत नव्याने निवडून आलेले संचालक मंडळातील संचालक यांना सहकारी कायदे व त्यातील नवीन बदल, ९७ वी घटना दुरुस्ती, उपविधीमध्ये झालेले बदल या सर्वांच्या आधारे संस्थेचे कामकाज अधिक सक्षमपणे पार पाडण्यासाठी व संस्था आर्थिकदृष्ट्या फायद्यात येण्यासाठी ज्या उपाययोजना करता येणार आहेत, त्या संदर्भातील हे प्रशिक्षण भविष्यात विविध कार्यकारी सहकारी संस्था मजबूत, भक्कम आणि परिपूर्ण बनण्यासाठी फायदेशीर ठरेल असा विश्वास रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन कमलाकर पाटील यांनी व्यक्त केला. ते रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आणि राज्य शिखर सहकार बँकेच्या माध्यमातून शिखर व संशोधन प्रशिक्षण संस्था वाशी, नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय सहकार प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी बोलत होते.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील सहकार क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचे विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी, संचालक यांच्यासाठी शिखर संशोधन व प्रशिक्षण संस्था वाशी, नवी मुंबई यांच्या माध्यमातून दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण संस्थेचे श्री. सुर्वे, श्री. तावडे आणि श्री. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यावेळी प्रशिक्षक सावंत यांनी केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार सर्व कार्यकारी संस्था संगणकीकृत होणे अत्यावश्यक असून या सर्व संस्था आपल्या मातृसंस्थेशी म्हणजेच जिल्हा बँकेशी जोडणे आवश्यक असल्याचे व त्यासाठी करावयाची योग्य कार्यवाही बाबत मार्गदर्शन केले. त्यासोबतच कार्यकारी संस्था हात कशा चालविल्या पाहिजे, त्यातून कर्ज वितरण, अर्थिक व्यवहार याबाबतचे मार्गदर्शन प्रशिक्षक सुर्वे साहेब यांनी केले तर सहकाराच्या प्रगतीसाठी जिल्हा बँक, राज्य बँक व नाबार्ड ही त्रिसूत्री कायम अग्रेसर असली पाहिजे आणि त्यासाठी कार्यकारी संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे असे मार्गदर्शन प्रशिक्षक तावडे यांनी केले.
सदर प्रशिक्षण रत्नागिरी येथील केंद्रावर संपन्न झाले. या दोन दिवशीय प्रशिक्षणामध्ये विविध कार्यकारी संस्थेचे कामकाज अधिक सक्षमपणे पार पाडण्यासाठी व संस्था आर्थिकदृष्ट्या फायद्यात येण्यासाठी, संस्था सक्षम करण्यासाठीच्या उपाययोजना यासह विविध बाबींची माहिती देण्यात आली. याप्रसंगी रत्नागिरी तालुक्यातील एकूण ५४ विविध कार्यकारी संस्थापैकी मोठया प्रमाणात अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी उपस्थितांमधील सगळ्यांच्याच मते अशा प्रशिक्षणामुळे वेगवेगळ्या प्रकारची माहिती आम्हा प्रशिक्षणार्थ्यांना मिळाली असून भविष्यात अशा प्रशिक्षणाच्या आयोजनामुळे कार्यकारी संस्था बळकट करण्यासाठी आवश्यक बाबींची माहिती मिळण्यासाठी मदत झाल्याने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि संचालक मंडळींना धन्यवाद दिले.
याप्रसंगी गजानन पाटील यांनी भविष्यातही अशा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून, ज्याप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रामध्ये सहकार अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये रुजला आणि त्यामुळे तेथील शेतकरी, कष्टकरी आणि कामकरी वर्ग सुखावलेला आपल्याला पाहायला मिळतो. तशाच प्रकारचा सहकार कोकणातही आपण रुजविण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर तानाजीराव चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी या प्रशिक्षणाच्या उद्घाटन आणि समारोप प्रसंगी बँकेचे संचालक रामभाऊ गराटे हे उपस्थित होते. या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी रत्नागिरी तालुक्याचे तालुका क्षेत्रीय अधिकारी संदीप तांबेकर, तालुका शाखेचे ओएसडी भावे साहेब, तालुका विभागीय क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र जाधव, श्रीयुत गंगावणे, प्रदीप परीट, भिकाजी तावडे यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी वर्गाने मोठी मेहनत घेतली.