( मुंबई )
मोफत शिक्षणाचा अधिकार (आरटीई ) काद्यानुसार राज्यातील खासगी इंग्रजी शाळांमध्ये आरक्षित २५ टक्के जागांसाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत ९४ हजार ७०० बालकांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ८१ हजार १२९ बालकांचे अर्ज अद्याप वोटिंगवर असल्याची माहिती शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात बालकांचे अर्ज निवडण्यात आले असून पालकांनी प्रवेश तपासण्यासाठी वेबसाईटवर लॉगिन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आरटीई प्रवेशाची वेबसाईट डाऊन झाली होती.
आरटीई प्रवेशाची पहिली सोडत बुधवारी जाहीर झाली असून बुधवारी पालकांना त्यांच्या मोबाईलवर प्रवेश संदर्भात संदेश प्राप्त झाले. पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशासंबंधी माहिती देण्यात आली असली तरी आरटीई प्रवेशाच्या वेबसाईटवर जाऊन प्रवेशाची स्थिती पाहण्याच्या सूचना पालकांना देण्यात आल्या आहेत. मात्र सर्व्हरच्या समस्येमुळे आरटीई प्रवेशाची वेबसाईट डाऊन झाली आहे. बुधवारी ज्या पालकांना प्रवेश अर्ज निवडण्यात आल्याचे संदेश प्राप्त झाले आहेत, अशा पालकांनी समितीकडे जाऊन १३ ते २५ एप्रिलदरम्यान ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
ज्या पालकांना मोबाईलवर एसएमएस प्राप्त झाले आहेत अशांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता प्रवेश समीतिकडे जाऊन प्रवेश निश्चितीची पावती घेणे आवश्यक आहे. निवड यादीतील बालकांची प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतिक्षा यादीतील बालकांना अनुक्रमे प्रवेशाचे एसएमएस पाठवले जाणार आहेत, असे कळविण्यात आले आहे.