(रत्नागिरी)
सर्वसामान्य जनतेचे विचार करून त्यांना परवडणाऱ्या सुविधा रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात अल्प दरात उपलब्ध करून द्याव्यात यासाठी समाजकल्याण सभापती व हातभार फाऊंडेशन अध्यक्ष परशुराम मारुती कदम यांनी जिल्हाधिकारी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य जनतेला एमआरआय तपासणीसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. या ठिकाणचा खर्च अवाढव्य असल्यामुळे सर्वसामान्यांना तो परवडणारा नाही. त्यामुळे एमआरआयची सुविधा सर्वसामान्य जनतेला अल्प दरात जिल्हा शासकीय रुग्णालयात उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी परशुराम कदम यांनी केली आहे.
जिल्ह्यातील विकास कामांचे आराखडे तयार करण्यात आले. मात्र आरोग्याच्या प्रश्नाबाबत ग्रामीण भागातील जनतेला रुग्णाला वाचवण्यासाठी कर्ज काढून आरोग्य सेवेसाठी इतर जिल्ह्यात जावे लागत आहे. साधा एमआरआय काढायचा असला तरीही पाच हजार रुपये खाजगी रुग्णालयात द्यावे लागतात. हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. हा एमआरआय करण्यासाठी सुद्धा ते इतरांकडून उसने पैसे घेऊन उपचार करुन घेतात. काहीजणं तर त्याकडे दुर्लक्षही करतात. त्यामुळे योग्य उपचाराअभावी रुग्णाला जीव गमवावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेता शासकीय रुग्णालयात एमआरआयसाठीची यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. त्यासाठी 500 ते 1000 रुपये एवढी रक्कम सर्वसामान्य माणसाकडून आकारण्यात यावी.
या मिळणार्या रकमेमधून आरोग्य उपकरणे देखभाल व तात्पुरते आरोग्य कर्मचारी यांचे पगार निघू शकतील. अशी तरतूद केली तर सर्वसामान्य जनतेला न्याय दिल्यासारखा होईल.
एमआरआयसाठी खासगी तंत्रज्ञांकडे जावे लागते. ही यंत्रणा शासकीय रुग्णालयात झाली पाहीजे अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे केली आहे. शिवाय याबाबतचे आणखी निवेदन आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव यांच्याकडे परशुराम कदम यांनी केली आहे.