(फुणगूस / एजाज पटेल)
गेले काही वर्षे स्वछता न केलेल्या पिण्याच्या टाकीतील पाणी दूषित आहे, याची कल्पना नसल्याने हेच पाणी पिऊन संगमेश्वर स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना आपली तहान भागवावी लागत होती. मात्र यापासून आजार बळावतील याची कल्पना असूनही एस.टी प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत प्रवाशांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ करीत होते.
प्रवाशी जनतेला पिण्यासाठी ज्या टाकीतून पाण्याची सोय केली होती. ती टाकी सहजासहजी दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवण्यात आली आहे. टाकी ठेवलेल्या ठिकाणी रान, कचरा व घाणीचे तर साम्राज्य होते. त्याहून बिकट अवस्था त्या टाकीची जेवढी बाहेरून होती, त्याहुन अधिक आत होती. टाकीत पाण्याच्या खाली चिखलाचा थरच दिसून येत होता. हे पाहून काही वर्षे टाकीची स्वछता करण्यात आली नाही, याचा अंदाजच येत होता.
टाकी नजरेसमोर नसल्याने टाकीची अवस्था व दूषित पाणी असेल याबाबत कल्पना नसल्याने प्रवाशी याच पाण्याने लहान मुलांपासून तर अगदी वयोवृद्धही कोरडया घश्याची तहान भागवत होते. दूषित पाणी पिणे सोडाच त्या पाण्याने हात किंवा चेहरा धुवला तरी रोगराईला निमंत्रण दिले जाईल अशी येथील अवस्था असल्याचे दिसून येत होते. मात्र हे माहीत असूनही टाकीच्या स्वच्छतेकडे व्यवस्थापणाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते. याबाबत काही लोकांनी येथील प्रशासनाचे अनेकदा लक्षही वेधले होते. तरीही व्यवस्थपनाने त्याकडे दुर्लक्षच केल्याने अखेर नावडी येथील शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य तसेच नेहमीच अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे व जनहितासाठी आक्रमक नेता म्हणून ख्याती असलेले संजय कदम यांनी दोन दिवसात टाकीची व त्या कठड्याची साफसफाई करून शुद्ध पाण्याची प्रवाशांसाठी सोय करण्याची व्यवस्था केली नाही तर, कोणतीही पूर्वकल्पना न देता आगारात एकही बस आत वा बाहेर येऊ देणार नाही, असा शिवसेना स्टाईल आक्रमक इशारा एस.टी. महामंडळाला दिला होता.
काही वर्षे टाकी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या करणाऱ्या व्यवस्थापनाकडून काही तासातच टाकीची व कठड्याची साफसफाई व स्वच्छता करण्यात येऊन प्रवाशी जनतेसाठी शुद्ध पाण्याची सोय करण्यात आल्याने संजय कदम यांनी दिलेली शिवसेना (शिंदे गट) स्टाईल जालीम लसच लागू पडली अशी चर्चा संगमेश्वर परिसरात आहे. संजय कदम यांनी जनहीतासाठी घेतलेली भूमिका कौतुकास्पद असल्याचे म्हणत काहींनी प्रत्यक्षात भेटून तर काहीनी कॉल तसेच सोशल मीडिया वरून त्यांचे आभार मानले आहेत.