रत्नागिरी : जिल्हयातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन, गट तयार करुन शेती करा, पीक घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांनी केले. अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान यंत्रणा (आत्मा) जिल्हास्तरीय आंबा निर्यात कार्यशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलींद जोशी, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये येथील कृषि विद्यावेत्ता डॉ. वैभव शिंदे, संबधित अधिकारी आदि मान्यवर तसेच आंबा बागायतदार, शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन, गट तयार करुन अथवा सहकार पध्दतीने शेती केली, पीक घेतलं तर उत्पादन वाढेल, पिकांमधील गुणवत्ता वाढेल आणि फळ पिके निर्यातीमध्येही वाढ होईल. तसेच यामुळे उत्पादनासाठी येणारा खर्चही कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पीक घेताना जैविक स्त्रोत वापरा, जैविक पीक, शेती ही उत्तम गुणवत्तेची असते, आरोग्याच्या दृष्टिने जैविक शेतीवर भर द्या. जिल्हयामध्ये आंबा, काजू चे उत्पादन मोठया प्रमाणावर घेतले जाते. त्यांची निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने काम करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रास्तविकामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे म्हणाले जिल्हयामध्ये आंबा, काजू फळपीक मोठया प्रमाणावर घेतले जाते. आंबा उत्पादनामध्ये जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. येथे निर्यातीसाठी मोठी संधी आणि वाव आहे. याची जाणीव व जागृती करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेमध्ये आंबा निर्यात कार्यपध्दती, आंबा पिकावरील किड-रोग नियंत्रणासंबधी उपाययोजना, भौगोलिक मानांकन (GI) आदि विषयांवर मान्यंवरांनी आंबा बागायतदार, शेतकरी यांना मार्गदर्शन केले.
००००