(पुणे)
कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी कोथरुडच्या सुतारदरा भागात घराजवळ त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हत्येचे एक सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहे.
दरम्यान या प्रकरणात आता आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर फायरिंग करत खून करणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने मुळशीतील भादे गावात गोळीबाराचा सराव केल्याचे समोर आले आहे. मामाच्या बदल्यासाठी आरोपी मुन्ना पोळेकरने शरद मोहोळची हत्या केली. सुतारदरा इथं घराजवळच शरद मोहोळवर मुन्ना पोळेकरसह तिघांनी गोळीबार केला. या खुनासाठी महिनाभर ते भादे गावातील जंगलात गोळीबाराचा सराव करत होते. आता या सरावासाठी त्यांनी काडतुसे कुठून आणली? पिस्तुल कुठून आणि कुणाकडून विकत घेतले? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
शरद मोहोळ हत्या प्रकरणातील 6 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य आरोपीसह 6 आरोपींना 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार असून या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 2 वकिलांना मात्र केवळ 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.