व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी एक महत्वाची बातमी आहे. मेटा कंपनीने व्हाट्सएपमध्ये एक नवीन फिचर जोडले आहे, ज्याद्वारे वापरकर्ते पासवर्ड किंवा बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरून विशिष्ट चॅट हे लॉक करू शकतील. या फीचरला ‘चॅट लॉक’ असे नाव देण्यात आले आहे. हे फिचर संभाषण लॉक करण्याव्यतिरिक्त चॅट्स वेगळ्या फोल्डरमध्ये संग्रहित करेल. तसेच ते नोटिफिकेशनमधील नाव आणि येणारा संदेशही गुप्त ठेवेल. लॉक केलेल्या चॅट्स ऑथेंटिकेशननंतरच पाहता येतील.
व्हॉट्सअॅपच्या मालकीची कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टमध्ये चॅट लॉक फीचर सुरू झाल्याची माहिती दिली. व्हॉट्सअॅपमधील नवीन चॅट लॉकमुळे तुमचे संभाषण अधिक खाजगी होईल, असे त्यांनी लिहिले. हे फिचर युजर्सचे संभाषण लपवून ठेवते.
झुकरबर्ग यांनी एका निवेदनात म्हटले की, चॅट लॉक केल्याने तो थ्रेड इनबॉक्समधून बाहेर काढला जातो आणि तो फोल्डरच्या मागे ठेवला जातो, ज्यामध्ये फक्त डिव्हाइस पासवर्ड किंवा फिंगरप्रिंट सारख्या बायोमेट्रिकद्वारेच प्रवेश केला जाऊ शकतो. या फीचरच्या गरजेबाबत मार्कने सांगितले की, ज्यांना वेळोवेळी आपला फोन कुटुंबातील सदस्यासोबत शेअर करावा लागतो किंवा ज्या लोकांना त्यांचा फोन इतर कोणाशी कामानिमित्त शेअर करावा लागतो, त्यांच्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरेल.
हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही फोनवर उपलब्ध असेल. आतापर्यंत, वापरकर्ते बायोमेट्रिक्स किंवा पिन कोड वापरून व्हाट्सएप लॉक करू शकत होते, परंतु नवीन फिचर वापरकर्त्यांना विशिष्ट खाजगी चॅट्सचे संरक्षण करण्यास अनुमती देईल. तुमचा फोन कोणाच्याही हातात पडला तरी, व्हॉट्सअॅपवरील लॉक केलेल्या चॅटची गोपनीयता अबाधित राहील म्हणजेच तो चॅट थ्रेड कोणीही पाहू शकणार नाही.
दरम्यान, व्हॉट्सअॅपमध्ये सुरक्षा आणि गोपनीयतेसंदर्भात अनेक फीचर्स आधीच जोडले गेले आहेत. यामध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, एनक्रिप्टेड चॅट बॅकअप, अदृश्य होणारे संदेश, स्क्रीनशॉट ब्लॉक करणे आणि बरेच काही समाविष्ट आहे. आता या नवीन अपडेटसह, मेटा कंपनी व्हॉट्सअॅपची गोपनीयता आणि सुरक्षा अधिक मजबूत करू इच्छित आहे. यासाठी सर्वप्रथम, तुम्हाला व्हॉट्सअॅपवरील कोणत्याही चॅटवर टॅप करावे लागेल. यानंतर, चॅट लॉकचा पर्याय उपलब्ध होईल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही हे फीचर सक्रिय करू शकता.
🆕 privacy feature just dropped 🔒
With Chat Lock, now you can keep your most private and personal conversations under lock and key with a password. pic.twitter.com/NsM5NOka9A
— WhatsApp (@WhatsApp) May 15, 2023
असे वापरा नवे फिचर
हे फिचर वापरण्यासाठी तुम्हाला व्हाॅट्सअॅप अपडेट करावे लागेल. आता तुम्हाला जे चॅट्स लपवायचे आहेत त्यावर जा. नंतर त्या चॅटसह प्रोफाइल चित्राशेजारी व्यक्ती किंवा गटाच्या नावावर टॅप करा. डिसअपीयरिंग मेसेजच्या खाली तुम्हाला Lock Chat दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर चॅट लॉक होईल. आता हे चॅट पाहाण्यासाठी आता अॅपच्या मुख्यपृष्ठावर चॅटच्या तळाशी खाली स्क्रोल केल्यानंतर गुप्त फोल्डर दिसेल, ज्यावर टॅप करावे लागेल. त्यानंतर तुम्ही हे चॅट्स पाहू शकतात.
चॅट लपवण्यासाठी वापरण्यात येणारा पासवर्ड आणि मोबाईलचा पासवर्ड शक्यतो वेगळा ठेवा. कारण तुमच्याशिवाय एखाद्याला मोबाईल अनलाॅक पासवर्ड माहित असेल तर तो हे चॅट्स पाहू शकतो.